बेस्ट कामगारांच्या अनेक मागण्या गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे. बेस्टमध्ये होणाऱ्या खासगीकरणावर सुद्धा बेस्ट कर्मचारी नाराज आहेत तर, कंत्राटी कामगारांनी संप पुकारल्यामुळे सध्या अनेक प्रवाशांचे हाल होत आहे. बेस्ट उपक्रम गेली अनेक वर्ष या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे भाजप बेस्ट कामगार संघ आणि भारतीय जनता पक्ष मुंबई तर्फे बेस्ट आगारांच्या प्रवेशद्वाराजळ बेस्टमधील भ्रष्टाचाराची पोल-खोल करण्याकरता जन जागरण अभियान सुरु करण्यात येणार आहे.
( हेही वाचा : बेस्टचे कंत्राटी कामगार आक्रमक; बेमुदत संप सुरू )
जन जागरण अभियान
बेस्ट कर्मचाऱ्यांवर सतत होणारा अन्याय मोडून काढण्यासाठी तसेच बेस्ट कामगारांचे अनेक वर्षापासूनचे प्रलंबित असलेले प्रश्न व मागण्या तात्काळ सोडविण्यात याव्यात. तसेच बेस्टमधील भ्रष्टाचार, आगार अधिकाऱ्यांची मनमानी व दंडेलशाही कारभार याविरुद्ध जनजागृती आंदोलन बेस्ट कामगार संघामार्फत करण्यात येणार आहे. हे आंदोलन सोमवार दिनांक २३ मे २०२२ पासून बेस्ट आगार प्रवेशद्वारांवर करण्यात येणार आहे. जर बेस्ट उपक्रमाने आंदोलनापूर्वी भाजपच्या पत्राची नोंद घेतली नाही किंवा प्रलंबित असलेले प्रश्न सोडविले नाहीत. तर भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, सुनिल गणाचार्य (समिती सदस्य, संयोजन कामगार आघाडी मुंबई), गणेश खणखर, प्रकाश गंगाधरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येईल असे भाजपच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
कामगारांच्या प्रलंबित मागण्या खालीलप्रमाणे
- कामगारांचे प्रलंबित करार पूर्ण करणे
- बेस्टमध्ये ३ हजार ३३७ बसेसचा ताफा कायम राखणे.
- महागाई भत्ता, कोविड भत्ता, प्रवास भत्ता, इत्यादी भत्ते मिळणेबाबत.
- पगारवाढीतील राहिलेली थकबाकी देणे
- वरिष्ठ कामगारांची पदोन्नती