मुंबईतील कंत्राटी बेस्ट चालक गेल्या आठवड्यात संपावर गेले होते. कंत्राटदार कंपनीने वेतन वेळेत न दिल्यामुळे कर्मचाऱ्यांनी हा संप केला होता. एमपी नावाच्या या कंत्राटदाराकडे मुंबईतील पाच डेपोला बसचालकासह बस पुरवण्याचे कंत्राट आहे. संपामुळे वांद्रे, कुर्ला, कुलाबा, विक्रोळी आणि वडाळा या पाच आगारातील बस वाहतूक विस्कळीत होऊन प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती.
( हेही वाचा : गणपतीला गावाला जाताय? कोकणातील गाड्यांचे बुकिंग फुल्ल )
या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन मिळावे आणि त्यांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे अशी मागणी बेस्ट संघर्ष कामगार कर्मचारी युनियनने उपक्रमाकडे केली आहे. तसेच या विविध मागण्यांसाठी ६ मे रोजी दुपारी ३ वाजता वडाळा आगारात निदर्शने करण्याचा इशारा बेस्ट संघर्ष कामगार कर्मचारी युनियनचे नेते शशांक राव यांनी दिला आहे.
या प्रमुख मागण्यांसाठी निदर्शने
- कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात येईपर्यंत ‘समान काम, समान दाम’ या तत्वावर वेतन द्यावे.
- कार्यरत कर्मचाऱ्यांना तातडीने नियुक्तीपत्र द्यावे.
- दंडाच्या नावाखाली कर्मचाऱ्यांच्या वेतनातून बेकायदेशीर कपात तातडीने थांबवावी.
- कंत्राटी कर्मचाऱ्यांना बेस्ट उपक्रमात कायमस्वरूपी नोकरी द्यावी.