बेस्ट उपक्रमाने पर्यटक आणि प्रवाशांच्या सुविधेसाठी सहा महिन्यांपूर्वी ‘हॉप ऑन हॉप ऑफ’ ( हो-हो बस) ही सेवा सुरू केली, मात्र या बससेवेला मिळणाऱ्या अल्प प्रतिसादामुळे ही सुरू ठेवण्यासाठी उपक्रमाकडून धडपड सुरू करण्यात आली आहे. या सेवेची जाहिरात सर्वत्र करण्याचा निर्णय उपक्रमाने घेतला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या बससेवेला अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे उत्पन्नावर सुद्धा परिणाम होत आहे. अल्प प्रतिसादामुळे या बससेवेला जास्तीत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
बससेवेचा प्रतिसाद वाढवण्याचा प्रयत्न
शाळा, महाविद्यालय, खासगी कार्यालय, हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी जाऊन या बेस्ट बसची जाहिरात केली जाणार आहे. हा बससेवेची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून या बससेवेचा प्रतिसाद वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
‘हॉप ऑन हॉप ऑफ’ बससेवा म्हणजे काय?
‘हॉप ऑन हॉप ऑफ’ ही वातानुकूलित इलेक्ट्रिक बससेवा प्रवाशांना मुंबईतील प्रमुख पर्यटन स्थळांचे दर्शन घडवते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जुहू दरम्यान सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत ही बस दर अर्ध्या तासाने सेवा देते.
( हेही वाचा : बेस्ट उपक्रमाचे वीजग्राहकांना आवाहन! बनावट SMS पासून सतर्क रहा)
बस मार्ग
सीएसएमटी येथून वीर जिजामाता भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालय भायखळा, जुहू चौपाटी, वांद्रे बॅंडसॅण्ड, श्री सिद्धिविनायक मंदिर, नेहरू तारांगण, गिरगाव चौपाटी, तारपोरवाला मत्स्यालय मार्गे पुन्हा सीएसएमटी येथील शिवाजी महाराज वास्तूसंग्रहालय, वानखेडे स्टेडियम, नरिमन पॉइंट, मंत्रालय ही पर्यटनस्थळे या बसमधून पाहता येतात.
Join Our WhatsApp Community