‘बेस्ट’ खासगीकरणाच्या वाटेवर?

132

कंत्राटी बसगाडयांच्या देखभालीकरिता बेस्ट प्रशासनाने वर्षाभर प्रती बस फक्त १ रुपया याप्रमाणे संपूर्ण प्रतीक्षानगर आगार ‘मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड’ या कंत्राटदाराला आंदण म्हणून बहाल केला, आणि आता बेस्ट उपक्रमाच्या सांताक्रूझ आगारात सुद्धा २२ फेब्रुवारीला खासगी कंत्राटदाराच्या बसगाड्यांचा ताफा दाखल झालेला आहे. प्रतीक्षानगर आगारापाठोपाठ ओशिवरा, मालवणी, सांताक्रूझ हे बेस्टचे महत्वाचे तीन आगार सुद्धा उपक्रमाने कंत्राटदाराला बहाल केल्यामुळे कर्मचारी युनियनने सुद्धा आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे मुंबईकरांची बेस्ट आता हळूहळू खासगीकरणाच्या वाटेवर जात आहे असे कर्मचारी वर्गाकडून सांगण्यात येत आहे.

( हेही वाचा : वरळी किल्ल्यावर झगमगाट, पण वांद्रे किल्ल्याकडे दुर्लक्ष का? )

कर्मचाऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता नाही

बेस्ट प्रशासनाच्या या तडकाफडकी निर्णयांमुळे बेस्ट कर्मचारी मात्र धास्तावलेले आहेत. २०१७ भाऊबीजेच्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप केला होता. त्यावेळी सध्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करत शब्द दिला होता की, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पगाराचा प्रश्न तातडीने सोडवू तसेच बेस्टचा ‘अ’ अर्थसंकल्प पालिकेच्या ‘क’ अर्थसंकल्पात आम्ही विलीन करू असे जाहीर आश्वासन उद्धव ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांना दिले होते. ही आश्वासने पूर्ण न केल्याने कालांतराने २०१९ मध्ये बेस्टने पुन्हा एकदा संप केला. शशांक राव यांच्या मार्गदर्शनाखाली हा संप पुकारला गेला होता. यात मोठ्या संख्येने बेस्ट कर्मचारी सहभागी झाले होते.

खासगीकरणाच्या वाटेवर

या २०१९ च्या संपादरम्यान समंजस्य करार करण्यात आला होता. बेस्टचा विलिनीकरणाचा प्रश्न सोडवला जाईल, तसेच ३ हजार ३३७ बेस्ट बसगाड्या कायमस्वरुपी राखल्या जातील व या गाड्यांना लागणारे कर्मचारी नव्याने भरती केले जावे. परंतु याउलट आता बेस्ट प्रशासन केवळ खासगी गाड्या उपक्रमात भरती करत आहेत स्वत:ची एकही गाडी उपक्रम खरेदी करत नाही. गेल्या दोन वर्षात बेस्टच्या स्वमालकीच्या गाड्यांचा बसताफा अर्ध्यावर आला आहे. आता १८०० गाड्या बेस्टकडे उरल्या आहेत. त्यातील १ हजार गाड्या पुढील वर्षापर्यंत भंगारात जातील, तर २०२५ पर्यंत स्वमालकीच्या केवळ २२५ बसगाड्या उरतील आणि जवळपास १० हजारांचा कर्मचारी वर्ग उरेल. तसेच कोरोना काळात अविरत सेवा देऊनही कर्मचाऱ्यांना आजवर थकीत कोविड भत्ता देण्यात आलेला नाही यामुळेही कर्मचारी वर्गात असंतोष निर्माण झाला आहे. असे आपली बेस्ट आपल्यासाठी या समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

मुळातच बेस्टबाबत कोणताही अनुभव नसलेल्या ‘मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंत्राटदाराच्या आस्थापनेची कायदेशीर नोंदणी ही १३ जुलै २०२० रोजी फक्त रुपये १० लाख इतक्या भाग भांडवलावर झालेली असून ह्या कंत्राटदाराला बेस्टने इतक्या मोठ्या प्रमाणात बसगाड्या चालवण्याचे कंत्राट कसे काय दिले? अशा नवख्या कंत्राटदारांवर बेस्ट उपक्रमाने कसा विश्वास ठेवला असा प्रश्न आपली बेस्ट आपल्यासाठी या समितीने उपस्थित केला आहे.

खासगीकरणाचा कोणताही विचार नाही

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून बेस्ट उपक्रमाविषयी उलट सुलट अफवा पसरवल्या जात आहे. परंतु बेस्ट उपक्रमाने खासगीकरणाचा कोणताही विचार केला नाही आणि भविष्यकाळात देखील करणार नाही तसेच चांगली सेवा देण्यासाठी बेस्टच्या ताफ्यामध्ये अधिकाधिक बसगाड्यांचा समावेश करण्यात येत आहे. मुंबईकर जनतेने देखील त्यांना काय अपेक्षित आहे याच्या सूचना [email protected] या ईमेलवर पाठवाव्यात असे बेस्टने प्रसिद्धीपत्रक जारी करत स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.