बेस्टमधील कंत्राटीपद्धत बंद करून नियमानुसार भरती करा; प्रवाशांसह कर्मचाऱ्यांची मागणी

147

ऐन सणासुदीच्या काळात बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू आहे. यामुळे सामान्य मुंबईकर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. मुंबईतील सांताक्रुझ, मरोळ आदी आगारातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिवाळी बोनस, पगारवाढ अशा विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन केले. वारंवार कंत्राटी कर्मचारी आंदोलन करत असल्यामुळे उपक्रमात सुरू असलेल्या कंत्राटी पद्धतीवर आता मुंबईकर प्रवाशांनी प्रश्न उपस्थित केला आहे. कंत्राटी कर्मचारी आणि कंत्राटदारांवर बेस्ट उपक्रमाचे नियंत्रण नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

( हेही वाचा : नक्षलवाद संपवण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सक्षम; मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार )

खाजगीकरण बंद करावे…

या आंदोलनामुळे बेस्ट उपक्रमाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे बेस्टच्या नियमित कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण आला आहे. बेस्ट प्रशासनाने स्वतःचे सर्व कर्मचारी, बसेस ठेवल्या असत्या तर ही वेळच आली नसती अशाप्रकारची चर्चा सध्या नियमित सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे. बेस्ट प्रशासनाने यातून मार्ग काढत खाजगीकरण बंद करून स्वतःच्या मालकीच्या बसेस आणि त्यावरील कर्मचाऱ्यांची नियमाने भर्ती करावी, बेस्ट उपक्रमाला आणि मुंबईकरांना नेहमी होणारा मनस्ताप कायमचा संपवून टाकावा अशी मागणी सध्या कर्मचारी व मुंबईकर प्रवाशांकडून केली जात आहे.

३ कंत्राटदारांच्या माध्यामातून भाडेतत्वावरील सेवा

सध्या हंसा सिटी बस सर्व्हिसेस प्रा. लि, मातेश्वरी कंपनी, डागा व एमपी ग्रुप अशा चार कंत्राटदाराच्या माध्यमातून या बसेस चालवण्यात येतात. मात्र कंत्राटी कामगारांना वेतन देणे परवडत नाही म्हणून एमपी ग्रुपने सेवा देणे बंद केले असून उर्वरित ३ कंत्राटदाराच्या माध्यमातून भाडेतत्वावरील बस चालवण्यात येतात.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.