‘बेस्ट’मध्ये ९० महिला वाहकांची भरती

बेस्टमध्ये येत्या काही दिवसात महिला वाहकांची संख्या वाढणार आहे. ९० महिला वाहकांची ( कंडक्टर) नियुक्ती बेस्ट बसगाड्यांवर करण्यात येणार आहे अशी माहिती बेस्ट उपक्रमाने दिली आहे. या महिलांचे प्रशिक्षण सुरू असून या महिला लवकरच भाडेतत्वावरील बसगाड्यांवर कार्यरत होतील.

( हेही वाचा : ‘बेस्ट’ इलेक्ट्रिक बसच्या निविदेचा वाद; टाटा मोटर्सच्या याचिकेवरील निकाल राखीव)

बेस्टमध्ये ९० महिला वाहकांची भरती

बेस्टच्या ताफ्यात सध्या ३ हजार ५०० पेक्षा जास्त बसगाड्या असून यात स्वमालकीबरोबरच भाडेतत्वावरील बसगाड्यांचा सुद्धा समावेश आहे. भाडेतत्वावरील बसवर चालक कंपनीचा आणि वाहन बेस्ट उपक्रमाचा असतो. सध्या बेस्टमध्ये सुमारे ९ हजार वाहक आणि ९ हजार चालक आहेत. बेस्टमध्ये वाहकांच्या पदासाठी पुरूषांच्या बरोबरीने महिलांचाही समावेश करण्यात आला आहे. सध्या बेस्टमध्ये शंभर महिला कंत्राटी वाहक कार्यरत आहेत. त्यांची संख्या आणखी वाढवण्याचा निर्णय बेस्टने घेतला असून त्यानुसार कंत्राटदाराला परवानगी दिली आहे.

भाडेतत्त्वावरील बसची संख्या वाढणार

येत्या काही महिन्यांत भाडेतत्त्वावरील बस उपक्रमाच्या ताफ्यात दाखल होणार असून त्यावर आणखी ९० महिला नियुक्त केल्या जातील अशी माहिती उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली आहे. येत्या दीड ते दोन वर्षांत भाडेतत्त्वावरील बसची संख्या वाढणार आहे. त्यामुळे कंत्राटी चालकांबरोबरच वाहकांची भरती होईल, यात महिलाही असतील. तसेच बेस्ट लवकरच लक्ष्मी जाधव यांची चालक पदी नियुक्ती करणार असून आणखी दोन महिला चालकही उपक्रमात रूजू होणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here