इलेक्ट्रिक बस निविदा प्रक्रियेत अपात्र ठरविल्याबद्दल टाटा मोटार्स लिमिटेडने केलेली याचिका फेटाळण्यात यावी, अशी विनंती बेस्टने न्यायालयाकडे केली आहे. बेस्टच्या मते, टाटाने निविदेपूर्वीची आवश्यक असलेली कार्यवाही केली, त्यानंतर त्यांना काही तांत्रिका सुधारणा करण्याची विनंती करण्यात आली, तसेच निविदेकरिता त्यांना त्यांची आर्थिक व तांत्रिक बोली लावण्यास सांगितले होते. ६ मे रोजी बेस्टने निविदेचे तांत्रिक निकषाचे मूल्यमापन करीत टाटा मोटार्सला निविदा प्रक्रियेत भाग घेण्यास अपात्र ठरविले. त्यामुळे टाटा उच्च न्यायालयात पोहोचले आहे.
(हेही वाचा – ‘बेस्ट’च्या ताफ्यात २ हजार १०० इलेक्ट्रिक बस दाखल होणार!)
दरम्यान, बेस्टने १२ वर्षांसाठी ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट मॉडेलवर आधारित मुंबई आणि उपनगरांसाठी १४०० सिंगल डेकर वातानुकूलित इलेक्ट्रिक बसच्या स्टेट कॅरेज सेवेसाठी २६ फेब्रुवारी रोजी निविदा काढली होती. निविदा प्रक्रियेवर स्थगिती नसल्याने एव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेडला त्यांची निविदा स्वीकारल्याचे पत्र पाठविले आहे. तसेच टाटाने निविदेसाठी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता केली नाही. त्यामुळे त्यांची निविदा तांत्रिकदृष्ट्या गैर-प्रतिसादकारक ठरली असल्याचे बेस्टने आपल्या २४ पानी असलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
टाटाने न्यायालयाला अशी केली विनंती
निविदा अटींच्या अनुषंगाने त्यांच्या कोणत्याही बस या व्यत्ययाशिवाय ८० टक्के शुल्कासह २०० किमी धावू शकतील, अशी खात्री टाटाने निविदेत दिली आहे. टाटा मोटार्सने सादर केलेली बोली तांत्रिकदृष्ट्या गैर प्रतिसाद असल्याचे बेस्टने चुकीने म्हटले आहे. त्यामुळे बेस्टच्या निर्णयाचा पुनर्विचार केला जावा, असे म्हणत टाटाने न्यायालयाकडे याचिकेद्वारे विनंती केली आहे.
याचिकेत काय म्हटले…
बेस्टच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती टाटाने केली आहे. एव्हि ट्रान्सला हे कंत्राट मिळावे यासाठी टाटा मोटार्सची निविदा तांत्रिक कारण देऊन बाजूला करण्यात आली. तसेच बेस्टने काही निवडक नियमही शिथिल केले. त्याचा फायदा एव्ही ट्रान्सला झाला,असे टाटाने याचिकेत म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community