‘बेस्ट’ उपक्रमाचे जाहिरात हक्कांचे कंत्राट वादाच्या भोवऱ्यात!

131

बेस्ट उपक्रमाने बेस्टमधील जाहिरात हक्कांसाठी निवड केलेल्या कंत्राटदाराने कोणतीही थकीत बिले ठेवू नये अशी प्रमुख अट असते. मात्र, कंत्राटदाराने मासिक भाड्यातील ३० कोटी रुपयांची रक्कम थकीत ठेवली असून तरीही त्याच कंत्राटदाराला कंत्राट दिल्याचा आरोप मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.

( हेही वाचा : बृजभूषण सिंहांविरोधात मनसैनिक आक्रमक! दादर पोलीस स्थानकात तक्रार दाखल)

अटींची पूर्तता न करता कंत्राट दिल्याचा आरोप

बेस्ट उपक्रमाने तीन वर्षांचे जाहिरात हक्क देण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. निविदा प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या कंत्राटदाराची बिले प्रलंबित किंवा थकीत नसावीत अशी प्रमुख अट असते. परंतु ही कंपनी गेल्या तीन वर्षांपासून बेस्ट संदर्भातील जाहिरात हक्कांचे कंत्राट चालवत होती. तेव्हा या कंपनीने ३० कोटी एवढी मासिक भाड्याची रक्कम थकीत ठेवली असताना पुन्हा त्याच कंपनीला कंत्राट दिल्याचा मुद्दा रवी राजा यांनी उपस्थित केला आहे. बेस्टने कंत्राटदाराने बॅंक गॅरंटी म्हणून जमा केलेल्या रक्कमेतून थकीत रक्कम वसूल करणे आवश्यक असल्याचेही म्हटले आहे. बेस्ट प्रशासनाने निविदा अटींची पूर्तता न करता कंत्राट दिल्याचा आरोप त्यांनी बेस्टच्या महाव्यवस्थापकांसह मुंबई महापालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.

बेस्ट उपक्रम आर्थिक संकटाचा सामना करत असूनही संबंधित कंपनीसाठी पक्षपात केला जात असल्याचे रवी राजा यांचे म्हणणे आहे तसेच ही प्रक्रिया रोखण्यासाठी वेळ पडल्यास न्यायालयात दाद मागणार असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.