बेस्टच्या गाड्यांचा देखभालीचा खर्च कमी करण्यासाठी व बेस्टचे उत्पन्न वाढून तोटा कमी करण्यासाठी उपक्रमाने दोन वर्षांपूर्वी बेस्ट गाड्या भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला. परंतु या खासगीकरणाला कर्मचारी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. सद्यस्थितीत बेस्टमध्ये चालक वाहकांची कमतरता असून प्रवासी संख्या वाढली आहे. छोट्या एसी गाड्यांमध्ये आसनक्षमता कमी असल्यामुळे या बसेसचा काही प्रवाशांना फारसा फायदा होत नाही. रोज काम करणाऱ्या वाहक-चालक यांच्यावरील कामाचा ताण वाढत असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे दांड्या मारण्याचे प्रमाण वाढल्यामुळे बेस्ट उपक्रमात जबाबदार कायमस्वरूपी भरती करणे आवश्यक आहे असे बेस्ट समितीचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी स्पष्ट केले.
( हेही वाचा : ‘बेस्ट’च्या अक्षय चैतन्य आहारावर कामगार नाराज; उपहारगृहातील व्हिडिओ व्हायरल)
कायमस्वरुपी कर्मचारी भरती करणे आवश्यक
बेस्ट उपक्रमाच्या स्वमालकीच्या गाड्यांचा ताफा हा दिवसेंदिवस कमी होत चालला असून त्याबदल्यात आलेल्या खासगी कंत्राटदारांच्या बसेसमध्ये आसनक्षमता कमी आहे. मुंबईत बेस्टमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही ३० लाखांच्या पुढे गेल्यामुळे या खासगी कंत्राटदाराच्या बसेस सध्या अपुऱ्या पडत आहेत. कंत्राटदारांच्या बसेसमध्ये अनेकवेळा वाहक (कंडक्टर) नसल्यामुळे या बसेस सगळ्या थांब्यांवर थांबत नाहीत परिणामी प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होतेच परंतु गर्दीही वाढते आणि कर्मचाऱ्यांवरील ताणही वाढत आहे. प्रशासनाने खासगी कंत्राटदारांना आणण्याचा जो तुघलकी निर्णय घेतला हा निर्णय घेतल्यापासून आतापर्यंत बेसच्या तोट्यात वाढ होत आहे. बेस्टच्या स्वकर्मचाऱ्यांची संख्या कमी होत आहे. असा आरोप बेस्ट समितीचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी केला आहे. रोज काम करणाऱ्या वाहक-चालक यांच्यावरील कामाचा ताण वाढत असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे दांड्या मारण्याचे प्रमाण वाढले आहे. म्हणून कायमस्वरुपी कर्मचारी भरती करणे आवश्यक आहे म्हणूनच बेस्टने स्वमालकीच्या बसेस घ्याव्यात अशी मागणी गणाचार्यांनी केली आहे.
बेस्ट प्रवासी संख्या मध्यंतरी ३१ लाखांपर्यंत पोहोचली होती. मे महिन्यात ही संख्या जवळपास २७ लाखापर्यंत होती यात वाढ होणे बेस्टला अपेक्षित होते. साधारण ४० लाख प्रवासी येत्या काही महिन्यांत बेस्टने प्रवास करतील अशी बेस्टला आशा आहे, मात्र मिडी बसमुळे प्रवासी संख्या कमी झाली आहे.