गेल्या काही वर्षात बेस्ट प्रशासनाने मोठ्या प्रमाणात कंत्राटी कामगारांची नेमणून केली आहे, मात्र कंत्राटी कंपन्या मनमानी कारभार करत असल्याचे चित्र सध्या बेस्टमध्ये निर्माण झालेले आहे. बऱ्याचदा बसच्या फेऱ्या थेट रद्द केल्या जातात, मार्गबदल होतात याचा सर्वाधिक फटका प्रवाशांना बसून त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. गेल्या ६ महिन्यांमध्ये जवळपास ३ ते ४ वेळा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले होते. त्यामुळे कंत्राटदारांचा मनमानी कारभार केव्हा थांबणार असा संतप्त सवाल उपक्रमाचे कायमस्वरुपी कार्यरत असलेले बेस्ट कामगार करत आहे.
( हेही वाचा : स्वस्त मस्त BEST! मुंबईत फक्त १ रुपयात बस प्रवास)
दोषींवर कारवाई केली जाणार
नव्या बसवाहकांना मार्ग, थांबे माहिती नसल्यामुळे बऱ्याचवेळा प्रवासी आणि वाहकांमध्ये वादाचे प्रसंग निर्माण होतात. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अचानक दांड्या मारल्यामुळे लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द कराव्या लागतात. मध्यंतरी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपामुळे प्रवाशांची टाळण्यासाठी उपक्रमाने अतिरिक्त गाड्यांचे नियोजन केले होते. यावर बेस्ट बस गाड्यांचे वेळापत्रक आणि कर्मचाऱ्यांच्या ड्युट्यांचा चार्ट तपासला जाईल त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, हा विषय आम्ही गांभीर्याने घेतला असून दोषींवर कारवाई केली जाणार आहे असे मुख्य वाहतूक व्यवस्थापक रविंद्र शेट्टी यांनी सांगितले.
तोडगा काढणे आवश्यक
बेस्टचे जनरल मॅनेजर व ट्रॅफिक मॅनेजर यांची यावर बैठक सुरू असून यावर काय तोडगा काढता येईल याबाबत चर्चा सुरू असल्याचे ज्येष्ट बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी सांगितले. बेस्टचे सर्व कंत्राटदार, विभागप्रमुख, कामगार प्रतिनिधी यांनी सर्वांनी मिळून याबाबत चर्चा करणे गरजेचे आहे. मुंबईचे येत्या काळात जे पालकमंत्री होतील त्यांची भेट घेऊन बेस्ट ही मुंबईची लाईफलाईन असून वारंवार बससेवा अशी विस्कळीत झाल्यास याचा सामान्यांना फटका बसतो त्यामुळे यावर बैठक घेऊन, अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर बेस्टने काय अॅक्शन घ्यावी याबाबत मार्ग काढू असे गणाचार्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community