बेस्ट उपक्रमाने मुंबईत बसफेऱ्या वाढवण्यासाठी छोट्या आकाराच्या मिडी बसेस दाखल केल्या परंतु या बेस्टची प्रवासी संख्या प्रत्यक्षात वाढलेली नाही. त्यामुळे मिडी बसऐवजी यापुढे मोठ्या आकाराच्या बस ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. भाडेतत्वावरील ३ हजार वातानुकूलित मोठ्या आकाराच्या बस २०२३च्या अखेरपर्यंत टप्प्याटप्प्यात दाखल केल्या जाणार असल्याचे उपक्रमाकडून सांगण्यात आले आहे.
( हेही वाचा : दुसरे महायुद्ध, मुंबईचा डबेवाला ते ऑनलाइन ऑर्डर; Food वितरण प्रणालीचा रंजक इतिहास)
मिडी बसकडे प्रवाशांची पाठ
प्रवाशी संख्या, उत्पन्न, दैनंदिन वाढणारा खर्च इत्यादी कारणांमुळे बेस्ट उपक्रमाचा परिवहन विभाग तोट्यात गेला आहे. यामुळेच बेस्टने स्वमालकीपेक्षा भाडेतत्वावरील बस खरेदी करण्यावर भर दिला. बेस्टने उत्पन्न आणि बसच्या फेऱ्या वाढाव्या यासाठी वाहतूककोंडीतून मार्ग काढणाऱ्या मिडी बस दाखल केल्या. त्यानुसार सध्या १७०० हून अधिक मिनी, मिडी बस बेस्टच्या ताफ्यात असून उर्वरित बस या एकमजली, तसेच ४५ दुमजली बस आहेत. परंतु मिडी बसमुळे बेस्टच्या प्रवासी संख्येवर मर्यादा आल्या आहेत. मिडी बसची प्रवासी क्षमता कमी असल्याने बसमध्ये गर्दी होऊन अनेक प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागतो. यामुळे अनेक प्रवासी रिक्षा, टॅक्सीचा मार्ग निवडतात. त्यामुळे येत्या दीड वर्षांत फक्त मोठ्या आकाराच्या ३ हजार वातानुकूलित बस ताफ्यात दाखल केल्या जातील अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली. यामध्ये ९०० दुमजली बस सुद्धा असतील असेही त्यांनी सांगितले.
बेस्ट प्रवासी संख्या मध्यंतरी ३१ लाखांपर्यंत पोहोचली होती. मे महिन्यात ही संख्या जवळपास २७ लाखापर्यंत होती यात वाढ होणे बेस्टला अपेक्षित होते. साधारण ४० लाख प्रवासी येत्या काही महिन्यांत बेस्टने प्रवास करतील अशी बेस्टला आशा आहे, मात्र मिडी बसमुळे प्रवासी संख्या कमी झाली आहे.
( हेही वाचा : तरुणाने बेस्ट बसची काच फोडली…व्हिडिओ व्हायरल )
- बेस्ट एकूण ताफा – ३ हजार ६३८
- वातानुकूलित बस – १ हजार ४४०
- विना वातानुकूलित बस – २ हजार १९८
- एकूण मिडी बस – १ हजार २०६
- एकूण मिनी बस – ५५७
- मोठ्या आकाराच्या बस – १ हजार ८७५
- भाडेतत्वावरील बस – १ हजार ७७५