बेस्टमधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सकस आहार मिळावा यासाठी बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी ‘अक्षय चैतन्य’ योजना सुरु केली असून बेस्टच्या १३ आगारांमधील उपहारगृहांमध्ये टचस्टोन फाऊंडेशनच्यावतीने १८ रुपयांमध्ये नाश्ता आणि ३५ रुपयांमध्ये जेवण पुरवले जात आहे. यासाठी बेस्टच्या १२ आगारातील उपहार गृह बंद करून बेस्ट आणि टच स्टोन फाऊंडेशनच्या मदतीने ही योजना राबवली जात आहे. परंतु याबाबत बेस्ट कामगारांमध्ये नाराजी पसरली आहे. याविरोधात आता बेस्ट कामगार संघटना आक्रमक झाल्या असून भोजनाची पूर्वीप्रमाणे सोय न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा कामगार नेते सुनील गणाचार्य यांनी दिला आहे.
( हेही वाचा : आता IIT शिक्षक घडवणार! ४ वर्षीय बीएड अभ्यासक्रमाची योजना)
…तर तीव्र आंदोलन छेडले जाईल
बेस्ट उपक्रमातील बस आगारे व बस स्थानकांमधील कर्मचाऱ्यांकरता सुरू असलेली २४ तास, नाश्ता, चहा व जेवण उपलब्ध करणारी उपहारगृहे बंद करून या जागा सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतल्या कंत्राटदारांना आंदण म्हणून देण्यात आल्या. कुर्ला, वडाळा, वरळी, प्रतिक्षा नगर, कुलाबा इत्यादी उपहारगृहांमध्ये कार्यकर्त्यांचे अक्षरश: चैतन्य ओसंडून वाहू लागले, असा आरोप गणाचार्यांनी केला आहे. मात्र नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यानंतर उपहागृहामध्ये सध्या उंदरांचे दिवस सुरू झाल्याचे प्रतिक्षा नगर आगारामध्ये पहायला मिळाले. बेस्टची उपहारगृहे बंद करून त्याची सुमारे ३५ हजार चौरस फुटाची जागा गिळंकृत करण्याचे मोठे कारस्थान सुरू झाले आहे. बेस्ट प्रशासनाने यामध्ये तातडीने लक्ष देऊन बेस्टच्या कंत्राटी कामगारांच्या अल्पोहार व भोजनाच्या जागेची पूर्वीप्रमाणे सोय न केल्यास भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा सुद्धा ज्येष्ठ बेस्ट समिती सदस्य व कामगार नेते सुनील गणाचार्य यांनी दिला आहे.