आपत्कालीन स्थितीत माध्यमे, यंत्रणांत सुसंवाद आवश्यक – स्वप्निल सावरकर

121

आपत्कालीन स्थितीत संबंधित यंत्रणा आणि सरकारी आस्थापनांना वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागते. अशा आव्हानात्मक परिस्थितीत प्रसारमाध्यमांचीही भूमिका महत्त्वाची ठरते. कित्येकदा घटना घडल्यानंतर, संपर्क साधण्याचा उपाय हा मर्यादित ठरतो. सरकारी यंत्रणा आणि प्रसारमाध्यमांत संवाद वाढला तर जनहिताच्या कामांना नक्कीच वेग येईल, असा आशावाद ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक स्वप्निल सावरकर यांनी व्यक्त केला. रविवारी ठाण्यातील वर्तकनगर येथे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्मेंट या शैक्षणिक संस्थेच्यावतीने ‘आपत्कालीन व्यवस्थापनात प्रसारमाध्यमांची भूमिका’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी स्वप्निल सावरकर बोलत होते.

प्रसारमाध्यमांनी घटनाक्रम लावून धरावा

वाढत्या आपत्तीच्या घटनांबाबत प्रसारमाध्यमांनी असा घटनाक्रम सातत्याने लावून धरायला हवा, असा मुद्दा राज्य आपत्तीकालीन व्यवस्थापनाचे अधिकारी मिलिंद वैद्य यांनी मांडला. त्या सोबतच आपत्कालीन घटनेनंतर, सरकारी यंत्रणांनी केलेल्या कामगिरीची दखल घेतली जावी, अशी मागणीही वैद्य यांनी केली.

( हेही वाचा: अरविंद केजरीवालांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा )

..तर डिजीटल मीडिया लोकांपर्यंत पोहचेल

आपत्कालीन घटना घडण्याअगोदरही लोकापर्यंत घटनेची पूर्वकल्पना देण्यासाठी प्रसारमाध्यमांची मदत घेता येते. आपत्कालीन घटनांमधील हानी टाळण्यासाठी आवश्यक माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात प्रसारमाध्यमे मोलाची भूमिका बजावतात. त्यामुळे सरकारी यंत्रणा आणि प्रसारमाध्यमे हातात हात घालून काम करु शकतात, असा विश्वास सावरकर यांनी व्यक्त केला. आता बातम्यांचे स्वरुप डिजिटल झाले आहे. लोकांमध्ये बदल घडवतील, या आशयाची माहिती या डिजिटल युगात सरकारी यंत्रणांनी द्यावी, जेणेकरुन डिजिटल मीडिया लोकांपर्यंत वेळेवर माहिती पोहोचवेल, असेही सावरकर यांनी सांगितले.

कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती

डिजिटल मिडियासोबत आता समाजमाध्यमांचे जाळेही वाढत आहे. समाजमाध्यमांचा वापर योग्य पद्धतीने व्हायला हवा, या मुद्द्याकडेही सावरकर यांनी लक्ष वेधले. प्रसारमाध्यमांसोबत प्रशासनानेही योग्य पावले उचलणे गरजेचे असल्याचे, मत सावकर यांनी व्यक्त केले. यावेळी ठाणे जिल्ह्याच्या आपत्तीकालीन व्यवस्थापन अधिकारी अनिता भोईर, ठाणे विभागीय आपत्तीकालीन व्यवस्थापन केंद्राचे प्रमुख अविनाश सावंत, ठाणे जिल्ह्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके, अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांती माने आदी प्रमुख अधिकारीही या कार्यशाळेत उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.