आता शाळेत शिकवली जाणार ‘श्रीमद् भगवत् गीता’ ! ‘या’ राज्याने घेतला मोठा निर्णय

213

गुजरात सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शाळांमध्ये श्रीमद् भगवत् गीता शिकवली जाणार आहे. गुजरात सरकारने नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत ही घोषणा केली आहे. गुजरातचे शिक्षण मंत्री जितू वाघानी यांनी गुरुवारी सांगितले की, शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून शालेय शिक्षणात पहिल्या टप्प्यात सहावी ते बारावीच्या अभ्यासक्रमात भगवद्गीतेतील मूल्ये आणि तत्त्वे शिकवली जातील. नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत गीता वाचन बंधनकारक असणार आहे. इयत्ता 6वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना गीतेची तत्त्वे आणि मूल्ये समजावून सांगितली जातील.

स्पर्धांचे होणार आयोजन

शालेय मुलांना गीतेचे ज्ञान आणि मूल्ये समजण्यासाठी गीतेवर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.  वक्तृत्व स्पर्धा, श्लोक आणि गीतेवरील साहित्याचेही आयोजन करण्यात येणार आहे, असे सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. गुजरात राज्यात लवकरच निवडणुका होणार आहेत. याच वेळी गुजरात सरकारने शाळांमध्ये गीता शिकवण्याची घोषणा केली आहे. गुजरातमध्ये या वर्षी नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होऊ शकतात.

दिल्लीही तयारीत

 दक्षिण दिल्लीचे महापौर मुकेश सूर्यन म्हणाले की, अभ्यासक्रमात भारताचा “वास्तविक इतिहास” समाविष्ट करण्यासाठी आणखी बदल केले जात आहेत. ते म्हणाले की, आम आदमी पक्षाच्या नेतृत्वाखाली दिल्ली सरकार दारू विक्रीत व्यस्त असताना, आम्ही प्रत्येक प्रभागात इंग्रजी माध्यमाची शाळा उघडत आहोत. आम्ही प्राथमिक शाळांमध्येही गीता शिकवू. कोणीतरी आमच्या मॉडेल स्कूलला भेट द्यावी. इतिहासाच्या पुस्तकातून जाणीवपूर्वक वगळण्यात आलेल्या महान भारतीय वीरांच्या कार्याचा अभ्यासक्रमात समावेश केला जाईल, असे ते म्हणाले होते. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवून त्यांना खरे देशभक्त बनवण्यास मदत होईल, मुकेश म्हणाले.

( हेही वाचा :आता ‘एसटी’ च्या बसगाड्या खाजगी पेट्रोल पंपावर डिझेल भरणार! काय म्हटले पत्रकात, वाचा )

लवकरच  निवडणुका होणार

गुजरात विधानसभेच्या निवडणुका या वर्षी नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. कारण राज्यातील विद्यमान सरकारचा कार्यकाळ 18 फेब्रुवारी 2023 रोजी संपणार आहे. राज्यात सध्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली सरकार आहे. राज्यात विधानसभेच्या 182 जागा आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.