‘कोवॅक्सिन’ बाबत भारत बायोटेककडून मोठी माहिती… ‘या’ नव्या स्ट्रेन्सवरही लस प्रभावी

कोवॅक्सिन ही संपूर्णपणे भारतीय(स्वदेशी) लस असल्याने भारताच्या दृष्टीनेही ही अभिमानाची गोष्ट आहे. 

103

भारतातील लसीकरण मोहिमेत कोविशिल्ड लसीसोबतच महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असणा-या कोवॅक्सिन लसीच्या बाबतीत नवीन माहिती समोर येत आहे. कोवॅक्सिन लस ही भारत आणि ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या स्ट्रेनवर प्रभावी असल्याचे, कोवॅक्सिनची निर्मिती करणा-या भारत बायोटेकच्या वतीने सांगण्यात आले आहे.

ही आहे भारत बायोटेकची माहिती

हैद्राबाद येथील भारत बायोटेक कंपनीच्या मार्फत कोरोनावर प्रतिबंधात्मक असलेल्या कोवॅक्सिन लसीचे उत्पादन करण्यात येत आहे. ही लस भारतात नव्याने आढळून आलेल्या B.1.617 आणि ब्रिटनमध्ये आढळलेल्या B.1.1.7 या नव्या स्ट्रेनवर सुद्धा अत्यंत प्रभावी असल्याचे एका संशोधनात समोर आले आहे. याबाबतची माहिती भारत बायोटेकच्या सह-संस्थापक आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक सुचित्रा इला यांनी ट्वीट करत दिली आहे. B.1.617 या नव्या स्ट्रेनची घातक परिणामकारकता कमी करण्यात कोवॅक्सिन लस प्रभावी असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

(हेही वाचाः को-विनवर कोविशिल्डच्या दुस-या डोसची नोंदणी करताय? मग हे आहेत नवीन ‘बदल’)

आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी ओळख

कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे संशोधन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आणि इंडियन कौंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च(आयसीएमआर)च्या वतीने करण्यात आले आहे. सुचित्रा इला यांनी याबाबत ट्वीट करताना, कोवॅक्सिनला आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळाल्याचे म्हटले आहे. तसेच यामुळे भारत बायोटेकच्या शिरपेचात नवा तुरा रोवला गेल्याचेही, त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून म्हटले आहे. कोवॅक्सिन ही संपूर्णपणे भारतीय(स्वदेशी) लस असल्याने भारताच्या दृष्टीनेही ही अभिमानाची गोष्ट आहे.

अमेरिकेनेही केला होता खुलासा

अमेरिकेतील कोरोनाबाधित रुग्णांपैकी ज्यांना कोवॅक्सिनचा डोस देण्यात आला आहे, त्याआधारे कोरोनाच्या 617 व्हेरियंट्सवर ही लस प्रभावी ठरत असल्याचा निष्कर्ष समोर आला. याबाबतची माहिती काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे मुख्य वैद्यकीय सल्लागार आणि महारोग तज्ज्ञ डॉ. अँथनी फाउकी यांनी दिली होती. कोवॅक्सिन लस शरीरात अँटिबॉडी तयार करुन रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. या अँटिबॉडीमुळे शरीरातील विषाणूवर मात करण्यास मदत होत असल्याचे, न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या एका वृत्तात म्हटले आहे.

(हेही वाचाः कोवॅक्सिनबाबत अमेरिकेने केला मोठा खुलासा! कोवॅक्सिन लस प्रभावी आहे का? वाचा…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.