‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांच्या माजी अंगरक्षकाला भोवली परदेशवारी

134

पोलीस विभागाला कुठलीही माहिती न देता परदेशवारी करणाऱ्या बिग बी अमिताभ बच्चन यांचा माजी अंगरक्षक पोलीस हवालदार जितेंद्र शिंदे याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, या संदर्भात शिंदे याच्याभोवती विभागीय चौकशीचा फास देखील आवळण्यात आला आहे. २०१५ पासून अभिनेत्याच्या सुरक्षा रक्षकांपैकी एक म्हणून कार्यरत असलेले शिंदे यांच्यावर हे आरोप झाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या संरक्षण शाखेतून त्यांची बदली डीबी मार्ग पोलिस ठाण्यात करण्यात आली होती, आणि त्याच्याविरुद्ध चौकशीचे आदेश देण्यात आले होते. पोलिसांनी मात्र त्यांच्या बदलीचा त्याच्यावर झालेल्या आरोपाशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले होते.

( हेही वाचा : बापरे! पतीने सोफा उघडला अन् दिसला पत्नीचा मृतदेह )

व्हीआयपी सुरक्षेची जबाबदारी

जितेंद्र शिंदे हे मुंबई पोलिसांच्या संरक्षण विभागात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असताना त्यांच्याकडे व्हीआयपी सुरक्षेची जबाबदारी सोपविण्यात आली होती. शिंदे हे २०१५ ते २०२१ या कालावधीत बिग बी अमिताभ बच्चन यांच्याकडे सुरक्षा रक्षक म्हणून होते. शिंदे यांना या दरम्यान अमिताभ यांच्याकडून दीड कोटी रुपये मिळाले होते, असा आरोप करण्यात आला होता. शिंदे यांच्याविरुद्धची प्राथमिक चौकशी पूर्ण करून अहवाल मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या चौकशीत शिंदे यांनी दीड कोटी रुपये कमावल्याचा आरोप खोटा असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सूचना न देता परदेशवारी 

या चौकशी दरम्यान शिंदे यांची बदली साईड ब्रांचला करण्यात आली होती. शिंदे यांची चौकशी सुरु असताना चौकशीत शिंदे यांनी पत्नीसह परदेशवारी केल्याचे समोर आले होते. शिंदे यांनी पोलीस सेवेत असताना परदेशवारीसाठी जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचा रीतसर अर्ज केला नव्हता किंवा वरिष्ठांना याबाबत कुठलीही सूचना न देता पत्नीसह दुबई आणि सिंगापूर येथे चार ते पाच वेळा गेल्याचे समोर आले. सुट्टीवर जाताना खोटी माहिती दिल्याप्रकरणी चौकशीमध्ये दोषी आढळला असून त्याच्यावर मंगळवारी निलंबनाची कारवाई आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.