कडक निर्बंधांमुळे फुल शेतीचे मोठे नुकसान! काय आहे वसई-विरारमधील फुल शेतक-यांची व्यथा? वाचा…

टवटवीत आणि सुगंधित फुलांनी प्रसन्न करणा-या या फुल शेतक-यांचे चेहरे मात्र, या कडक निर्बंधांमुळे कोमेजले आहेत. त्यांच्या शेतातील फुलांचा बहर आता झाडावर सडून जात आहे. त्यामुळे आता करायचे काय, असा प्रश्न या शेतक-यांसमोर उभा राहिला आहे.

168

ब्रेक दि चेन… कोरानाला हद्दपार करण्यासाठी असलेला एकमेव उपाय. त्यामुळे कडक निर्बंधांचे पालन हे झालेच पाहिजे. त्याला पर्याय नाही. असे शासनाकडून सांगितले जात आहे. आता कोरोनाची साखळी मोडण्यासाठी कडक निर्बंध लावले, पण हे कडक निर्बंध अनेकांचे कंबरडे मोडत आहे. हीच व्यथा आहे वसई-विरारच्या फुल शेतकरी बांधवांची. भीषण असे आर्थिक नुकसान गेल्या वर्षी सहन केल्यानंतर यावर्षी तरी फुल शेतीतून मिळणा-या उत्पन्नाला चांगला ‘बहर’ येईल, अशी अपेक्षा या फुल शेतक-यांना होती. पण यावर्षी पुन्हा एकदा त्यांची निराशा झाली. एरव्ही शेतात घाम गाळून, टवटवीत आणि सुगंधित फुलांनी प्रसन्न करणा-या या फुल शेतक-यांचे चेहरे मात्र, या कडक निर्बंधांमुळे कोमेजले आहेत. त्यांच्या शेतातील फुलांचा बहर आता झाडावर सडून जात आहे. त्यामुळे आता करायचे काय, असा प्रश्न या शेतक-यांसमोर उभा राहिला आहे.

का होत आहे फुल शेतक-यांचे नुकसान?

दादर ही फुल शेतकरी आणि विक्रेत्यांसाठी मोठी बाजारपेठ. या बाजारपेठेत सजावटीच्या फुलांना मागणी असतेच. पण सुंगधी फुलांना सगळ्यात जास्त मागणी असते. वसई-विरार पट्टा हा फुल शेतीसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. वसई-विरारमध्ये मोगरा, चाफा, जुई, सायली यांसारख्या सुगंधी फुलांची मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. पण ही फुलं जितकी सुगंधी असतात, तितकीच ती नाशवंतही असतात. सकाळी ही फुलं झाडावरुन काढली की ती संध्याकाळपर्यंत कोमेजून जातात. त्यामुळे या फुलांचा व्यवसाय करणा-या शेतक-यांना कुठल्याही परिस्थितीत संध्याकाळपर्यंत ही फुले विकावी लागतात. कारण एकदा का ती कोमेजली, की ती कितीही सुगंधी असली तरी त्यांना काहीही किंमत राहत नाहीत.

WhatsApp Image 2021 04 15 at 5.46.45 PM

(हेही वाचाः संचारबंदीमुळे डबेवाल्यांची ‘उपासमार’!)

तसेच ही फुले झाडावरुन काढली नाहीत, तर झाड खराब होण्याची भीती असते. या फुल शेतीवर वसई-विरार मधील अनेक शेतक-यांचा आणि शेतात काम करणा-या मजुरांचा रोजगार अवलंबून आहे. हे शेतकरी दररोज आपल्या शेतातील फुले दादर सारख्या मोठ्या बाजारपेठेत विक्रीसाठी नेत असतात. पण आता फुल बाजार बंद झाल्यामुळे ही फुलं झाडावर सडून जात असल्याने मोठ्या प्रमाणावर शेतक-यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे, असे स्थानिक शेतक-यांचे म्हणणे आहे.

सलग दोन वर्षे मोठे आर्थिक नुकसान

साधारणतः मार्च ते जुलै या महिन्यांचा काळ हा फुल शेतीसाठी अतिशय उपयुक्त असा काळ असतो. या काळात गुढी पाडवा, राम नवमी यांसासारखे अनेक उत्सव तसेच लग्नसराई असल्याने फुलांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. या चार महिन्यांच्या काळात फुल शेतक-यांना खूप मोठा आर्थिक फायदा होतो. पण गेल्या वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर झाल्याने, मंदिरे, कौटुंबिक आणि धार्मिक कार्यक्रम बंद असल्याने फुलांची मागणी घटली. त्यामुळे या फुल शेतक-यांना खूप मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. कोविड काळ असल्याने या शेतक-यांनीही आपले नुकसान होत असताना सुद्धा कुठलीही आर्थिक अपेक्षा न करता सरकारला सहकार्य केले. पण याही वर्षी याच काळात कडक निर्बंध असल्यामुळे आता आपल्याला हे परवडणारे नाही, असे स्थानिक शेतक-यांचे म्हणणे आहे.

WhatsApp Image 2021 04 15 at 5.46.44 PM

(हेही वाचाः ब्रेक दि चेन: लोकल ट्रेनने प्रवास करता येईल का? निर्बंधांबाबत आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर…)

उत्पन्न नसतानाही मजुरांना दिले अर्थसहाय्य

लॉकडाऊनच्या काळात इतर सर्व क्षेत्रात कामगारांची कपात तसेच पगार कपात करण्यात आली. पण वसई-विरारमधील फुल शेतक-यांनी आपल्या शेतात राबणा-या मजुरांना उत्पन्नाचे साधन नसताना सुद्धा त्यांची पूर्ण मजुरी दिली. याबाबत बोलताना शेतकरी सोसायटीचे संचालक किरण पाटील म्हणाले की, शेतात काम करणारे शेतमजूर हे शतक-याच्या कुटुंबातीलच एक आहेत. त्यामुळे माझे कुटुंब, माझी जबाबदारी म्हणत या लॉकडाऊनच्या काळात शेतक-यांनी मजुरांना कुठलीही चणचण भासणार नाही याकडे लक्ष दिले. त्यांची रोजी-रोटी चालू राहावी म्हणून त्यांना सर्वतोपरी मदत केली. पण आता लॉकडाऊनमुळे उत्पन्नच होत नसल्याने, शेतक-याची आर्थिक बाजू कमकुवत झाली आहे. शेत टिकवण्यासाठी लागणारी खते-किटकनाशके यावर खर्च करण्यासाठी या शेतक-यांनी कर्ज काढले. पण आता उत्पन्नाची शाश्वती नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आता शेती सोडून इतर व्यवसायांकडे वळले आहेत. ही भविष्यातील फुल शेती व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय गंभीर असल्याचे किरण पाटील यांनी सांगितले. या संदर्भात आपण एक पत्र सुद्धा आमदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

WhatsApp Image 2021 04 15 at 5.43.43 PM

(हेही वाचाः कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा! मुख्यमंत्र्यांचे मोदींना पत्र)

 ही आहे फुल शेतक-यांची मागणी

दादर येथे फक्त भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांना अत्यावश्यक सेवेत असल्याने फळे व भाज्या विक्री करण्यास मुंबई महापालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. पण फुल विक्रीला बंदी आहे. त्यामुळे शासनाने सकाळच्या वेळी फक्त पाच तास फुल विक्रीला परवानगी द्यावी, अशी शेतक-यांची मागणी असल्याचे किरण पाटील यांनी सांगितले. सध्याची परिस्थिती आपल्याला कळत आहे. कोरोनाची साखळी मोडण्यासाठी आपणही सरकारच्या पाठीशी उभे आहोत. फक्त शासनाने सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत फुल विक्रीला परवानगी देऊन शेतक-यांना सहकार्य करावे, असे शेतक-यांचे म्हणणे आहे. आता मंदिरे आणि इतर कार्यक्रम बंद असले तरी घरगुती पूजेत फुलं ही लागतात. त्यामुळे शेतक-यांचा ५० टक्के माल जरी विकला गेला तरी त्यांच्या पोटापाण्यापुरतं पुरेसे आहे.

सरकारने शेती करणा-यावर कुठेही बंधने घातलेली नाहीत. पण फुलांसारख्या नाशवंत शेतीतून मिळणारा माल जर विकताच आला नाही तर शेती करुन करायचे काय, असा प्रश्न आता शेतक-यांसमोर असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षभरात ८० ते ९० टक्के फुल शेतक-यांनी खते आणि किटकनाशकांचा वापरच केला नाही. शेतक-यांच्या मनात ही शेतीविषयी ही नकारात्मकता निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे फुल शेतकरी आता शेतीपासून दूर जात आहे. म्हणूनच फळे व भाजीपाल्याप्रमाणे फुलांना सुद्धा अत्यावश्यक घटकांमधून विक्रीसाठी परवानगी द्यावी, अशी सर्व फुल शेतक-यांची सरकारकडे मागणी आहे.

-किरण पाटील, संचालक (शेतकरी सोसायटी) व अध्यक्ष (अर्नाळा सेंद्रीय उत्पादक गट)  

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.