साईबाबांच्या दर्शनासाठी तासनतास दर्शनरांगेत उभे राहण्यापासून भक्तांची आता सुटका होणार आहे. साईबाबा संस्थानने तब्बल 109 कोटी रुपये खर्चून बांधलेली अत्याधुनिक दर्शनरांग काॅम्लेक्स लवकरच सुरु होणार आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज देशभरातून हजारो भाविक हजेरी लावत असतात. त्यांना साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी तासनतास दर्शनरांगेत उभे राहावे लागते. आता मात्र नव्याने बांधण्यात आलेल्या दर्शनरांगेत भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अत्याधुनिक दर्शनरांग ही संपूर्ण वातानुकूलीन असून, साईभक्तांच्या सुरक्षेची विशेष काळजी यात घेण्यात आली आहे. शिर्डीत आल्यानंतर भक्तांना दर्शनपास काऊंटर, लाॅकर, चप्पल स्टॅण्ड, लाडू काऊंटर, डोनेशन काऊंटर, ऊदी स्टाॅल, टाॅयलेट अशा अनेक गोष्टींची शोधाशोध करावी लागते. आता मात्र, एकाच छाताखाली सर्वकाही सुविधा करण्यात आल्या आहेत.
दर्शनरांगेत 11 हजार भाविक बसू शकतील
साईबाबा संस्थानच्या या नव्याने बांधण्यात आलेल्या दर्शनरांगेत 11 हजार भाविक बसू शकतील, असे वातानुकूलीन हाॅल बनवण्यात आले आहेत. जिथे भक्तांना बसता येईल आणि आल्हाददायक दर्शन कसे दिले जाईल, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे, असे साईमंदिरचे कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community