काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, यात भारतीयांच्या मनात कोणतीही शंका नाही. पण असे असतानाच बिहारच्या शिक्षण विभागाचा निंदनीय प्रकार समोर आला आहे. बिहार शिक्षण विभागाकडून घेण्यात येणा-या परीक्षेत काश्मीरचा उल्लेख स्वतंत्र देश म्हणून करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
काश्मीरचा स्वतंत्र देश म्हणून उल्लेख
बिहारमधील किशनगंज जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. सर्व शिक्षण अभियानांतर्गत बिहारमध्ये माध्यमिक शाळांच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. यामध्ये इयत्ता 7वीच्या एका प्रश्नपत्रिकेत काश्मीरचा उल्लेख स्वतंत्र देश असा करण्यात आला आहे. चीन, नेपाळ,इग्लंड,भारत आणि काश्मीर या पाच देशांमध्ये राहणा-या लोकांना काय संबोधतात असा प्रश्न विचारण्यात आला आहे. कहर म्हणजे 2017 च्या शासकीय विद्यापीठाच्या परीक्षेत सुद्धा हाच प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामुळे बिहार शिक्षण विभागाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
भाजपचा निशाणा
2017 रोजी अशीच चूक होऊन सुद्धा बिहार शिक्षण विभागाने त्यातून कोणताही धडा घेतला नाही. पाच वर्षांनंतर पुन्हा तोच प्रश्न विचारुन शिक्षण विभागाने आपला भोंगळ कारभा पुन्हा एकदा दाखवून दिला आहे. दरम्यान यानंतर भाजपने बिहारमधील महागठबंधन सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजप नेते सुशांत गोप यांनी हा प्रकार अतिशय निंदनीय असल्याचे म्हटले आहे. काश्मीर हा भारताचा भाग नसल्याची गोष्ट विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्यात येत असल्याचा आरोप गोप यांनी केला आहे. हे महागठबंधन सरकारचे एकप्रकारे षडयंत्र असल्याचेही गोप यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community