भारत सरकार रेल्वेमध्ये सुधारणा करण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. तसेच, नवनवीन आधुनिक सुविधा उपलब्ध करुन रेल्वेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण रेल्वेमध्ये होणारा भ्रष्टाचार काही कमी व्हायचं नाव घेत नाही. आता बिहारमधून भ्रष्टाचाराचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बिहारमधील समस्तीपुर विभागामध्ये रेल्वे इंजिनीअर म्हणून काम करणा-या व्यक्तीने रेल्वेच्या मालकीचं इंजिन विकल्याचा अजब प्रकार समोर आला आहे.
असा झाला भांडाफोड
मागील ब-याच वर्षांपासून पूर्णिया कोर्ट स्थानकामध्ये उभं असणारं रेल्वेचं जुनं वाफेवर चालणारं इंजिन एका इंजिनीअरने परस्पर विकून टाकलं आहे. एका कर्मचा-याने माहिती दिल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. इंजिनीअरने डीआरएमची सही, शिक्का असलेला खोटा कागद दाखवून, हे इंजिन विकलं. या प्रकरणाची माहिती कोणाला लागू नये म्हणून एका पोलिसाच्या मदतीने रेल्वेच्या शेडमध्ये एका पीकअप व्हॅनची नोंदही या इंजिनीअरने करुन घेतली. पण, शेडमधील एका कर्मचा-याने केलेल्या तक्रारीनंतर इंजिनीअरने केलेल्या घोटाळ्याचा भांडाफोड झाला आहे.
इंजिनीअरचा शोध सुरु
खोटा आदेश दाखवून इंजिन कापण्याचा प्रयत्न करणाऱ्या इंजिनीअरचा आता शोध घेतला जात आहे. तसेच ज्या पिकअप व्हॅनची नोंद करण्यात आली तिचाही शोध घेतला जात आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर डीआरएमच्या आदेशानुसार संबंधित इंजिनीअर, हेल्पर आणि डीझेल कारशेडवर तैनात असणाऱ्या वीरेंद्र द्विवेदी यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं आहे. समस्तीपुर विभागाच्या सुरक्षा विभागाचे आयुक्त ए. के. लाल यांनी दिलेल्या माहितीनुसार एम. एम. रहमानला डिझेल शेडमधील भंगाराच्या सामानाचं जे पत्र दाखवण्यात आलं, त्या संदर्भात चौकशी सुरु केली असता असं पत्र जारी करण्यात आलं नव्हतं असं समोर आलं. मागील दोन दिवसांपासून रेल्वेचे अधिकारी या इंजिनीअरचा आणि त्या पीकअप ट्रकचा तपास शोध घेत आहेत.
( हेही वाचा: बहुजनांना एकत्र करण्यासाठी भाजपाचा ‘महोत्सव’ )