स्वतःला वाचवण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे नियम आपण रोज पाळत नसू. पण व्हॉट्सअप, फेसबूक आणि इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंगच्या त्रिसूत्री शिवाय आपण जगूच शकत नाही. पण ही त्रसूत्री सोमवारी रात्रीपासून तब्बल 6 तास बंद झाल्याने अनेकांचा डिजीटल श्वास गुदमरायला लागला होता. अखेर पहाटे 4च्या दरम्यान ही सोशल नेटवर्किंग साईट्स सुरू झाल्याने मोबाईलला ऑक्सिजन मिळून अनेकांच्या जीवात जीव आला.
परंतु यामुळे फेसबूक कंपनीला फार मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे जगातील श्रीमंतांच्या यादीत मार्क झुकेरबर्ग एक स्थान खाली गेले आहेत.
(हेही वाचाः सोशल मीडिया ठप्प, नेटकरी बैचेन! )
फेसबूकच्या शेअर्समध्ये घसरण
हे तिन्ही अॅप्स अचानक बंद झाल्याने फेसबूकला मोठा आर्थिक फटकाही बसला आहे. फेसबूकच्या शेअर्समध्ये एका दिवसात 4.9 टक्क्यांनी घसरण झाली आहे. यामुळे फेसबूकचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले आहे. हा बिघाड फेसबूकच्या इतिहासातील आतापर्यंत झालेला सर्वात मोठा बिघाड असल्याचे इंटरनेट समस्येबाबत माहिती देणा-या Downdetector या वेबसाईटने सांगितले आहे. जगभरातील 10.6 मिलियन युजर्सनी याबाबत रिपोर्ट केले आहे.
मार्क यांची संपत्ती घटली
सप्टेंबरच्या मध्यापासून फेसबूकच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे. सप्टेंबरच्या मध्यापासून आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 15 टक्क्यांची घसरण झाली आहे. सोमवारी झालेल्या सर्व्हर क्रॅशमुळे 4 ऑक्टोबर रोजी मार्क झुकेरबर्ग यांच्या संपत्तीत घसरण होऊन ती 12 हजार 160 करोड झाली आहे. ब्लूबर्गद्वारे तयार केलेल्या जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत मार्क झुकेरबर्ग एक स्थान खाली आले आहेत. या यादीत आता त्यांना मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेट्स यांनी मागे टाकले आहे.
झुकेरबर्गने मागितली माफी
जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणा-या या तिन्ही अॅप्सचे सर्व्हर डाऊन झाल्याने सोमवारी रात्रीपासून ही सुविधा अचानक बंद झाली होती. यामागे असलेले नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. पण यामुळे आपल्या युजर्सना जो त्रास सहन करावा लागला त्याची जाणीव ठेवत फेसबूकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी फेसबूक पोस्ट करत दिलगिरी व्यक्त केली आहे.
फेसबूक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप आणि मेसेंजर या सुविधा पुन्हा सुरू झाल्या आहेत. तुमच्या प्रियजनांशी संपर्कात राहण्यासाठी तुम्ही या प्लॅटफॉर्म्सवर अवलंबून असल्याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे झालेल्या त्रासाबदद्ल मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. अशा शब्दांत झुकेरबर्ग यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
(हेही वाचाः एनसीबीचे ‘ऑपरेशन कॉर्डिलीया क्रूझ’… वाचा संपूर्ण कारवाईचा ‘थरार’)
Join Our WhatsApp Community