पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडानंतर देशभरात चर्चेत आलेली लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या निशाण्यावर बॉलिवूडमधील काही बडे निर्माते आणि अभिनेते आले आहे. दोन आठवड्यापूर्वी या टोळीने सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र पाठवून बॉलिवूडमध्ये खळबळ उडवून दिली आहे. दाऊद टोळीनंतर लॉरेन्स बिष्णोईच्या बॉलिवूड एन्ट्रीने बडे निर्माते आणि अभिनेत्यामध्ये दहशत पसरली आहे.
या तिघांना पुण्यातील एका हत्येप्रकरणी अटक
पंजाबी गायक आणि रॅपर असलेल्या सिद्धू मुसेवाला याची गेल्या महिन्यांत पंजाबमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. ही हत्या तिहार तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिष्णोई याच्या इशाऱ्यावरून करण्यात आल्याचे समोर होती. या हत्येनंतर लॉरेन्स बिष्णोई हा कुप्रसिद्धीच्या झोतात आला आहे. देशभरात या लॉरेन्स बिष्णोई टोळीची चर्चा सुरू असताना सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना चिठ्ठी पाठवून ठार मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले. मुसेवाला हत्याकांडमध्ये लॉरेन्स बिष्णोई टोळीने जे शूटर वापरले, त्यापैकी पुण्यातील काही शूटर यांचा समावेश असल्याचे समोर आले. याप्रकरणी पुणे पोलिसांनी संतोष जाधव, नवनाथ सूर्यवंशी, सौरभ महाकाल या तिघांना पुण्यातील एका हत्येप्रकरणी अटक केली. संतोष जाधव हा लॉरेन्स बिष्णोई टोळीचा सदस्य असून त्याच्यावर पुणे ग्रामीणमध्ये अनेक गुन्हे दाखल आहे, त्याच बरोबर सौरभ महाकाळ हा देखील बिष्णोई टोळीशी संबंधित आहे.
(हेही वाचा मत बाद झाले, तर याद राखा! शिवसेनेने आमदारांना दिला दम)
बिष्णोई टोळीच्या यादीत आणखी काही निर्माते आणि बडे अभिनेते
सलमान खान प्रकरणात मुंबई पोलिसांनी महाकाळ यांच्याकडे चौकशी केली असता सलमानचे वडील सलीम खान यांना चिठ्ठी पाठवणारा बिष्णोई टोळीतील सदस्य असून राजस्थान येथून तिघे जण आले होते व त्यांनी मला संपर्क करून चिठ्ठी ठेवण्यासाठी सांगितले होते. मात्र मी नकार दिल्यानंतर या तिघांनी ती चिठ्ठी ठेवली असल्याचे महाकालने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. त्याच बरोबर लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या यादीत बॉलिवूडचे आणखी काही निर्माते आणि बडे अभिनेते असल्याचे त्याने सांगितले. सलमान खान धमकी प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेने हाती घेतला असून तपास करीत आहे.