दिंडोशी बेस्ट आगारात अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे आम्हाला त्रास होत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. त्याबााबत त्यांनी भाजप बेस्ट कामगार संघटनेचे सल्लागार सुनील गणाचार्य यांच्याकडे तक्रारही केली आहे. याची दखल घेऊन सुनील गणाचार्य हे ६ एप्रिल २०२२ रोजी दुपारी २ वाजता दिंडोशी आगार येथे कामगारांना होणारा त्रास व अत्याचाराबद्दल अधिकाऱ्यांना जाब विचारण्यास जाणार आहेत. यानंतर तरी या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार थांबेल अशी अपेक्षा कामगारांना आहे.
दिंडोशी आगारात इतर आगारातून बदली होऊन आलेले नवीन अधिकारी, तेथील कर्मचाऱ्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास देत आहेत. दिंडोशी आगारात दिवसेंदिवस कर्मचारी तसेच बसेसची संख्या कमी होत आहे. याउलट प्रवासी संख्या मात्र वाढत आहे. यामुळेच कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण आला आहे. त्यामुळेच कामगारांचा जीव जाईपर्यंत मनमानी पद्धतीने काम करून घेतले जाणार आहे का असा सवाल आगारातील कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
( हेही वाचा : बेस्ट मार्गात ‘असे’ होणार बदल! जाणून घ्या… )
भाजपचे आवाहन
या अत्याचाराविरोधात भाजप बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य आक्रमक झाले असून ६ एप्रिलला दिंडोशी आगाराला भेट देणार आहेथ. यावेळी दिंडोशी आगारातील अधिकाऱ्यांच्या दबावामुळे होणारा शारीरिक व मानसिक त्रासाविरोधात आवाज उठवण्यासाठी जास्तीतजास्त कामगारांनी वेळेत आगारात उपस्थित राहावे. तसेच ६ एप्रिल हा भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस असल्यामुळे, यावेळी भाजपा कामगार पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्यांनी आवर्जुन उपस्थिती लावावी, असे आवाहन गणाचार्य यांनी केले आहे.
कर्मचाऱ्यांचा आरोप
कामाचा ताण वाढला असला तरी कामगार निमुटपणे आपले काम करीत आहेत. परंतु काही वेळेस हे डेपो अधिकारी स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करत असल्याचा आरोप कर्मचारी करत आहेत. ग्राऊंड बुकिंगला जिथे तीन कामगारांचे काम आहे तिथे एका कामगाराकडून जबरदस्तीने काम करून घेतले जात आहे. एवढेच नाही तर त्यांना रस्त्याच्या दोन्ही बाजूला काम करा असे अधिकारी सांगतात. ग्राऊंड बुकिंग करणाऱ्यांना आठ तास नियमबाह्य ड्युटी दिली जात आहे त्यातले चार तास ऊभे राहून काम करावे लागते, यावेळी प्यायला पाणी नसते तसेच नैसर्गिक विधीलाही जाता येत नाही एवढे काम वाढले आहे. असा आरोप दिंडोशी आगारातील बेस्ट कर्मचाऱ्यांनी केला आहे.
हे अधिकारी रिकामी बस एका पाठोपाठ पाठवून उपक्रमाचे आर्थिक नुकसान करीत आहेत. तसेच कामगारांना रात्री घरी जायला वेळेवर वर्कमेन पण मिळत नाही. अशा प्रकारे दिंडोशी आगारातील नवीन अधिकारी कामगारांना मानसिक, शारीरिक मनस्ताप देत आहेत, असा कामगारांचा आरोप आहे.
Join Our WhatsApp Community