पहिल्याच प्रत्यक्ष सभेत भाजपाच्या नगरसेवकांना मास्क लावण्याचा पडला विसर!

प्रत्यक्ष बैठका घेण्यासाठी भाजपने आग्रही भूमिका मांडत, निदर्शन करून कोर्टातही याचिका दाखल केली होती

154

राज्य शासनाच्या निर्देशानुसार मुंबई महापालिकेतील विविध समितीच्या प्रत्यक्ष बैठक सुरू झाल्या आहेत. या बैठकांमध्ये कोविड नियमांचे पालन करूनच या सभा घेण्यात याव्यात, असे स्पष्ट निर्देश असतानादेखील ज्या भाजपने प्रत्यक्ष सभा घेण्यासाठी कोर्टाची पायरी चढली होती, त्याच भाजपने तोंडाला मास्क लावून सभेत बसणे आवश्यक असतानाही शासनाच्या नियमालाच हरताळ फासल्याचे दिसले. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासह सर्व कर्मचारी, अधिकारी आणि पत्रकार हे मास्क लावून सभागृहात असताना सभागृह नेत्या, शिक्षण समिती अध्यक्षा आणि भाजपच्या नगरसेवकांना तर मास्क घालण्याचा विसर पडला.

२६ ऑक्टोबरपासून पालिकेच्या प्रत्यक्ष बैठका सुरू

कोरोनामुळे मुंबई महापालिका सभागृहासह विविध समित्यांच्या बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येत होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतरही व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठका सुरूच होत्या. त्यामुळे या बैठका प्रत्यक्ष घेण्यासाठी भाजपने आग्रही भूमिका मांडत, निदर्शन केली होती. एवढेच नाही तर कोर्टातही याचिका दाखल केली. यावर कोर्टाने एखाद्या सदस्यांची प्रत्यक्ष बैठकीला बसायची इच्छा असेल तर, त्या सदस्याला बसायला द्यावे, मात्र सदस्यांना स्थायी बैठकीला बसू दिले नाही. दरम्यानच्या काळात राज्य शासनाने कोविड नियमांचे पालन करून, प्रत्यक्ष बैठका घेण्यास परवानगी दिली. त्यानुसार मंगळवार २६ ऑक्टोबरपासून पालिकेच्या विशेष समित्यांच्या प्रत्यक्ष बैठका झाल्या.

(हेही वाचा-वानखेडेंच्या चौकशीसाठी दिल्लीहून मुंबईत पाच अधिकारी दाखल)

…अन् भाजप सदस्य मास्क लावायला विसरले

स्थायी समितीच्या सभागृहात नगरसेवक, अधिकारी यांची गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे तेथे बैठक न घेता बुधवार २७ ऑक्टोबर रोजी महापालिका सभागृहात बैठक घेण्यात आली. पण अनेक नगरसेवक मास्क घालण्यास विसरले. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यासह अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे व अन्य अधिकाऱ्यांनी बैठक संपेपर्यंत मास्क घातले होते. मात्र सभागृह नेत्या विशाखा राऊत, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी यांच्यासह भाजप गटनेता प्रभाकर शिंदे, समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख, भाजप नगरसेवक कमलेश यादव, ज्योती अळवणी, राजेश्री शिरवडकर, विनोद मिश्रा, हरीश भांदीग्रे तसेच आदी नगरसेवक मास्क घालायला विसरले. या नगरसेवकांच्या नाकाच्या खालीही मास्क नव्हतं. त्यामुळे प्रत्यक्ष सभा सुरू झाल्यानंतर भाजप सदस्यांना मास्क न घालण्याची शुद्ध न राहिल्याने शासनाच्या परिपत्रकाची अंमलबजावणी कशी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.