मुंबईत लेप्टो स्पायरेसीच्या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी उंदीर मारण्याची मोहीम हाती घेतली जाते. यासाठी प्रत्येक उंदीर मारण्यासाठी २० ते २२ रुपये मोजले जात असून या मूषकांचा संहार करण्यासाठी विविध संस्थांची नेमणूक केली जाते. परंतु ही नेमणूक करताना किती उंदीर मारले? कुठल्या भागात मारले? कुठल्या पाळीत किती मारले याची कोणतीही माहिती न देता १२ वार्डात तब्बल १ कोटी रुपये खर्च केल्याचा प्रस्ताव सत्ताधारी पक्षाच्या मदतीने मंजूर करण्याचा प्रशासनाचा डाव भाजपने उधळवून लावला. भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी या प्रस्तावावर आक्षेप घेतल्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हा प्रस्ताव राखून ठेवत प्रशामनाला याची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
(हेही वाचा- औरंगाबादेतल्या शेतक-याला मोदींनी पाठवले 15 लाख! तुमचं अकाऊंट तपासा)
उंदीर मारण्याच्या प्रस्तावावर भाजपचा आक्षेप
मुंबई पालिकेच्या १२ प्रशासकीय कार्यलयांच्या हद्दीत उंदीर मारण्यासाठी केलेल्या १ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावावर भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समितीत जोरदार आक्षेप घेतला. उंदीर मारण्याच्या प्रस्तावात कोणतीही स्पष्टता नाही. १२ प्रशासकीय विभागात उंदीर मारण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात उधळपट्टी केली आहे. प्रस्तावामध्ये किती उंदीर मारले? त्यांची विल्हेवाट कशी लावली? त्यांची उत्पत्तीस्थाने काय होती ? कायमस्वरूपी नेमक्या उपायोजना काय केल्या? त्याची कुठलीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.
सत्ताधारी शिवसेनेने कडून ‘मूषक खर्च’?
गेली अनेक दिवस मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ६९ (क) आणि कलम ७२ अंतर्गत महापौर, महापालिका आयुक्त जो खर्च करतात. त्यामध्ये वारंवार त्रुटी आढळून आल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने अनेकवेळा त्रुटी दाखवून दिल्या आहेत. त्यानंतर सत्ताधारी आणि प्रशासनाने त्याबाबत दिलगिरीही व्यक्त केली आहे. तरीही वारंवार आर्थिक बाबींशी संबंधित या कलमांचा फायदा घेऊन सर्वसामान्य करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी केली जात असून भारतीय जनता पक्षाचा याला तीव्र विरोध आहे. प्रसंगी रस्त्यावर उतरू असा इशारा गटनेते शिंदे यांनी दिला आहे. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना शिंदे यांनी सत्ताधारी शिवसेनेने केलेला ‘मूषक खर्च’ म्हणजे सर्वसामान्य करदात्या मुंबईकरांच्या पैशाची उधळपट्टी असून शिवसेनेने घोटाळा करण्याची एकही जागा शिल्लक ठेवली नसल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
Join Our WhatsApp Community