वांद्र्यात ‘त्या’ जागेवर कर्करोग रुग्णालय बांधण्याची भाजपची मागणी

136

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एच/ पश्चिम’ प्रशासकीय कार्यालय हे दुसऱ्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आले असून या जागेवर मुंबई महापालिकेच्या माध्यमातून कर्करोगाचे रुग्णालय बांधले जावे अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. कर्करोग रुग्णांसाठी टाटा रुग्णालयाच्या धर्तीवर पश्चिम उपनगरात कर्करोगाचे रुग्णालय उभारले जावे असे भाजपने आपल्या मागणीत म्हटले आहे.

( हेही वाचा : बीडीडीला न्याय! सरकारी कर्मचाऱ्यांना कधी? )

जागेचा सदुपयोग होणे गरजेचे

हे प्रशासकीय कार्यालय वांद्रे (पश्चिम) परिसरातील सेंट मार्टिन्स मार्गावर होते. हे कार्यालय आता खार (पश्चिम) रेल्वे स्थानकाजवळील दुसऱ्या हसनाबाद लेनमधील महानगरपालिकेच्या प्रशस्त जागेत उभारण्यात आले आहे. नवीन इमारतीत कार्यालय स्थानांतरित झाले आहे. त्यामुळे सेंट मार्टिन्स मार्गावरील जुन्या कार्यालयाची जागा रिकामी झालेली आहे. या जागेचा सदुपयोग होणे गरजेचे असल्याने या जागेवर कर्करोग रुग्णालय उभारले जावे अशी मागणी भाजपच्या नगरसेविका स्वप्ना म्हात्रे यांनी केली आहे.

( हेही वाचा : शिवसेना-भाजपची युती व्हावी असं महाविकास आघाडीतील ‘या’ मोठ्या पक्षाला वाटतं )

कर्करोग रुग्णालय सुरू करण्याची भाजपची मागणी

भारतामध्ये कॅन्सरच्या प्रमाणात फक्त, गेल्या एका वर्षात ३०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबईतील परळ येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे संपूर्ण भारतातून कॅन्सरबाधित रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे टाटा रुग्णालयात गरीब रुग्णांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते. त्यातून अनेकदा रुग्णांना उपचार मिळण्यासाठी उशीर होतो. तसेच काही रुग्णांना उपचाराआधी चाचण्या करायच्या असतात. त्यामुळे निदान झाल्यावर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होते. या टाटा रुग्णालयात भरती होण्याकरिता अनेकवेळा प्रतीक्षा करावी लागते, या रुग्णालयावरील ताण लक्षात घेता कर्करोग रुग्णालय बनवणे आवश्यक आहे.

( हेही वाचा : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महिलांचे प्रभाग ११४ वरून ११८ )

कर्करोगासारख्या दुर्धर आजारांवर खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात खर्च होतो. त्यामुळे मुंबईतील पश्चिम उपनगरात अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असे सुसज्ज कॅन्सर रुग्णालय सुरु करण्याची गरज असल्याचे म्हात्रे यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.