बोरीवली पश्चिममधील पुलाला “जनरल बिपीन रावत उड्डाणपूल” असे नाव देण्याची भाजपची मागणी

मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या बोरीवली पश्चिम येथील जनरल करीयप्पा पुलापासून थेट शिंपोलीकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून लवकरच हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. त्यामुळे या पुलाला सी डी एस प्रमुख “जनरल बिपीन रावत उड्डाणपूल” असे नाव देण्याची मागणी भाजपने केली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश खणकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांना निवेदन देत ही मागणी केली आहे.

वाहतूक कोंडीतून सुटका

बोरीवली पश्चिम येथील जनरल करीयप्पा पुलापासून थेट लिंक रोडपर्यंत जाणार उड्डाणपूलाचे बांधकाम पूर्ण झाले असून बोरीवली पूर्वेला पूर्व द्रुतगती महामार्गापर्यंत जोडणाऱ्या विस्तारीत पुलाचे काम अर्धवट असूनही तेही नियोजित वेळेत पूर्ण करण्याचा महापालिकेच्या पूल विभागाचा प्रयत्न आहे. त्यामुळे कल्पना चावला चौकच्या ठिकाणी उभारलेल्या या पुलाला “जनरल बिपीन रावत उड्डाणपूल” असे नाव द्यावे अशी मागणी खासदार गोपाळ शेट्टी यांनी केलेली आहे. या उड्डाणपुलामुळे बोरिवलीतील नागरिकांची स्वामी विवेकानंद मार्गावर (s.v.road) होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. या उड्डाण पुलाच्या कामासाठी गोपाळ शेट्टी यांनी पाठपुरावा केलेला आहे. आता या पुलाचे काम पूर्ण झाल्याने हा पूल त्वरित वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी खासदार शेट्टी यांनी केलेली आहे. हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यास येणाऱ्या पावसाळ्यात या उड्डाणपुलामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल, असा विश्वास शेट्टी यांनी केली जात आहे.

( हेही वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार का? )

या उड्डाणपुलाचे उद्घाटन करताना प्रमुख अतिथींसोबत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाही बोलवावे अशी आग्रही मागणी देखील खासदार गोपाळ शेट्टी यांनी केलेली आहे. याच मागणीचे पत्र घेऊन बोरीवली व कांदिवली विभागातील सर्व नगरसेवकांच्या शिष्ठमंडळाने भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश खणकर यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे व प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांची भेट घेतली. व या भेटीवेळी हा पूल त्वरित वाहतुकीसाठी खुला करावा व या उड्डाणपुलाचे उद्घाटन करताना प्रमुख अतिथींसोबत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाही बोलवावे अशी आग्रही मागणी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here