बुद्धीभेद निर्माण करणा-यांना सावरकरांच्या विचारांनीच उत्तर देऊ

सावरकरांचे हिंदुत्व हे कल्याणकारी आहे, ते कधीही प्रतिगामी असू शकत नाही.

दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे सोमवारी संपन्न झालेल्या मराठी कट्टा या कार्यक्रमाला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कार्य आणि त्यांच्या विचारांचं आजच्या काळात असलेले महत्व पटवून दिले.

मराठी भाषेला समृद्ध करण्याचं काम हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केले. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांबाबतही त्यांनी आपले मत मांडले. सावरकरांचे हिंदुत्व हे कल्याणकारी आहे, ते कधीही प्रतिगामी असू शकत नाही. त्यामुळे तथाकथित बुद्धीवाद्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांनीच आपण उत्तर देऊ शकतो, असे स्पष्ट मतही फडणवीस यांनी मांडले.

विज्ञाननिष्ठ सावरकर

सावरकरांचे हिंदुत्वाबाबतचे विचार हे प्रगतीशील आहेत. हिंदुत्व हे कधीही प्रतिगामी असू शकत नाही, हिंदू संस्कृती ही जगाचा विचार करणारी संस्कृती आहे, असे सावरकरांनी सांगितले. समाजातील विकृती दूर करण्याचं काम सावरकरांनी केले. प्रत्येक गोष्टीला विज्ञानाच्या कसोटीवर तपासून घेतल्याशिवाय सावरकर कधीच कुठलीही गोष्ट मान्य करत नसत. कितीही प्राचीन रुढी, परंपरा असल्या तरी त्यात विज्ञान सापडलं तरंच सावरकरांनी ते मान्य केलं, नाहीतर कोणी कितीही पांडित्य आणून त्या रुढींचं समर्थन केले तरी त्यांनी ते कधीही मानले नाही.

(हेही वाचाः मूठभर मूर्ख नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांचं कार्य कधीही मिटवू शकत नाहीत! फडणवीसांचा हल्लाबोल)

सावरकरांची शुद्धीकरण मोहीम 

एक सुधारक म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. हिंदू हा हिंदूच आहे, तो कधीही अहिंदू होऊ शकत नाही, असे ठामपणे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितले. ज्यांना आपल्याच समाजाने अहिंदू ठरवलं त्यांच्या शुद्धीकरणाची मोहीम राबवून त्यांना पुन्हा हिंदू समाजात आणण्याचं सर्वात मोठं कार्य हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केले आहे. सर्व जाती-धर्मातील लोकांना एकत्र करुन त्यांची भक्कम अशी मोट बांधून सावरकरांनी एक परिवर्तनाची लढाई सुरू केली, असे उद्गार सावरकरांच्या कार्याची महती सांगताना फडणवीसांनी काढले.

सावरकरांचे मोठे योगदान

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वाट्याला त्यांच्या जीवनात जन्मापासून ते मृत्यूपर्यंत कायमंच संघर्ष आला आहे. ख-या अर्थाने क्रांतिकारकांचे प्रेरक म्हणून त्यांच्याकडे आपण बघतो. सशस्त्र क्रांतीची संकल्पना त्यांनी देशात मांडली. त्यासाठी त्यांनी अनेकांना प्रेरित केलं. यामुळेच इंग्रजांच्या लक्षात आलं की आता भारत पेटून उठला आहे, आता भारतावर राज्य करणं आपल्याला शक्य नाही. स्वातंत्र्याच्या भावनेने देश पेटून उठवण्यात सगळ्यात मोठं योगदान हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे आहे, असे फडणवीस यावेळी म्हणाले.

(हेही वाचाः वारकरी शिल्पाची समाजकंटकांकडून मोडतोड! ठाकरे सरकारविरोधात संताप)

1857च्या स्वातंत्र्य समरातून खरा इतिहास जगासमोर आला

1857च्या स्वातंत्र्यसमराचा जाज्वल्य इतिहास स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जगासमोर आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. तो इतिहास जर भारतीयांपर्यंत पोहोचला तर एका नव्या स्वातंत्र्ययुद्धाची बीजं यातच आहेत हे इंग्रजांना कळलं होतं. त्यामुळे हा इतिहास दडपून टाकण्याचा इंग्रजांनी प्रयत्न केला. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यासाठी सातत्याने संघर्ष केला, त्या पुस्तकातील ख-या इतिहासामुळेच अनेकांना स्फुरण मिळालं.

‘माझी जन्मठेप’ वाचताना प्रेरणा मिळते

माझी जन्मठेप वाचताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या यातना भोगल्या ते वाचून अंगावर रोमांच उभे राहतात. एका व्यक्तीमध्ये हे इतकं तेज कसं काय असू शकतं, असा प्रश्न आपल्याला पडतो. ज्यावेळेस त्यांना दोन जन्मठेप सुनावण्यात आल्या तेव्हा इंग्रज न्यायाधीशांनासुद्धा पुनर्जन्माबाबत विश्वास पटला आणि त्यांनी मला दोन जन्मठेपेच्या शिक्षा सुनावल्या, अशा प्रकारचे विचार स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यावेळी मांडले. हे विचार थक्क करणारे आहेत असे फडणवीस म्हणाले.

आझाद हिंद सेनेला सावरकरांच्या विचारांची प्रेरणा

सुभाषचंद्र बोस यांनी 1857चा सावरकरांनी लिहिलेला इतिहास आझाद हिंद सेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाचायला सांगितला. ज्यावेळी स्वातंत्र्यवीरांना वाळीत टाकण्याचा प्रयत्न केला जात होता, त्यावेळी स्वतंत्र भारताचा पहिला झेंडा रोवणा-या सुभाषचंद्र बोस यांनी सावरकरांच्या चिरकाल टिकणा-या विचारांची प्रेरणा आझाद हिंद सेनेला दिली.

(हेही वाचाः वीर सावरकर आमच्यासाठी दैवत, त्यांचा अवमान सहन करणार नाही!)

सावरकर कुटुंबियांचा त्याग

सावरकरांच्या संपूर्ण कुटुंबाने आपल्या स्वातंत्र्यासाठी त्याग केला आहे. एकाच तुरुंगात असून सुद्धा ज्यावेळी अनेक वर्षांनंतर सावरकर आपले बंधू बाबाराव सावरकरांना भेटले, तेव्हा स्वातंत्र्यासाठी काय करता येईल या गोष्टींवर त्यांनी चर्चा केली. ही खरी देशभक्ती आहे.

सावरकरांच्या विचारांनीच उत्तर देऊ

संपूर्ण देशासाठी सावरकर मोठे आहेतच, पण मराठी माणसाच्या मनावरही स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अधिराज्य गाजवले आहे. त्यामुळे देशात बुद्धीभेद निर्माण करणा-या तथाकथित बुद्धीवाद्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांनीच आपण उत्तर देऊ शकतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडलेला शाश्वत विचार कोणीही कधीही समाप्त करू शकत नाही, असेही मत देवेंद्र फडणवीस यांनी मांडले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here