किरीट सोमय्या… सध्या चर्चेत असलेले हे नाव. महाविकास आघाडीच्या नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढत सोमय्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडवणाऱ्या सोमय्यांनी आतापर्यंत बऱ्याच राज्यातील नेत्यांची झोप उडवली आहे. सोमय्यांनी आजवर कुणाकुणावर आरोप केले त्यावर एक नजर टाकू.
अशोक चव्हाण
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री. आदर्श घोटाळा हे नाव जरी ऐकलं तरी आपल्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे अशोक चव्हाण यांचे नाव. सर्वाधिक गाजलेला हा घोटाळा सोमय्या यांनीच उघड केला होता. मुंबईतल्या आदर्श सोसायटीमध्ये अशोक चव्हाण यांच्या तीन नातेवाईकांना सदनिका देण्यात आल्याने अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपद गमवावे लागले होते.
(हेही वाचाः सोमय्यांवरील कारवाईची निवृत्त न्यायमूर्तीकडून चौकशी व्हावी! भाजपाची मागणी )
छगन भुजबळ
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना देखील सोमय्या यांनी अडचणीत आणले होते. कथित महाराष्ट्र सदन घोटाळा, सदनिका घोटाळा आणि आर्मस्ट्राँग घोटाळा, अशा वेगवेगळे आरोप सोमय्यांनी केले आहेत. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात तर भुजबळ यांना दोन वर्षे तुरुंगात जावे लागले होते. भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना झालेल्या महाराष्ट्र सदन बांधकामात घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. यामध्ये भुजबळ यांना लाखो रुपयांची लाच देण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. नुकतंच महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं भुजबळ यांना दोषमुक्त केलं आहे.
अजित पवार
किरीट सोमय्या यांच्या आरोपातून अजित दादा देखील सुटलेले नाहीत. कथित सिंचन घोटाळा प्रकरणी किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप केले होते.
(हेही वाचाः किरीट सोमय्या पुण्यात! अजित पवार निशाण्यावर!)
अनिल परब
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी वांद्रे पुर्वेकडील गांधी नगरमधील इमारत क्रमांक 57 आणि 58 मधील मोकळी जागा बळकावून अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी लोकायुक्तांकडे दाद मागितली होती. लोकायुक्तांनी याबाबत झालेल्या सुनावणीवेळी गृहनिर्माण विभागाला एका महिन्याच्या आत कारवाईचे निर्देश दिल्याची माहिती सोमय्या यांनी प्रसार माध्यमांना दिली. म्हाडाने यासंदर्भात यापूर्वी नोटीस बजावल्या होत्या. त्यावेळी संबंधित अनधिकृत बांधकामाशी माझा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर म्हाडाने त्या मागे घेतल्या. आताही म्हाडाकडून योग्य कारवाई होईल, असे सांगत परिवहन मंत्री परब यांनी हात झटकले आहेत.
प्रताप सरनाईक
प्रताप सरनाईक यांनी एनएसईएल मध्ये अडीचशे कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. या घोटाळ्यांच्या पैशातून त्यांनी जमीन खरेदी केल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला. याबाबत ईडीकडून प्रताप सरनाईक यांच्या ठाण्याच्या आणि मुंबईच्या अशा दोन्ही घरांवर छापेमारी करण्यात आली. याबाबत वेळोवेळी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलांना देण्यात आले आहे.
(हेही वाचाः सोमय्यांच्या यादीत आणखी तीन मंत्र्यांची होणार एंट्री)
रवींद्र वायकर
रवींद्र वायकर यांनी अलिबाग मधील कोलई गावात अन्वय नाईक यांच्यासोबत ३० जमिनींचे करार केले. हे जमिनींचे करार, ग्रामपंचायतीमध्ये केलेले अर्ज, रजिस्ट्रेशन, त्यांच्यावरील १९ बंगले याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ही सर्व माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपवण्यात आली असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी वायकर यांच्यावर केला आहे. 19 बंगल्यांची प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी रवींद्र वायकर यांच्या पत्नीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावाची कागदपत्र सादर करण्यात आली आहेत. मात्र याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आपल्या प्रतिज्ञापत्रमध्ये काहीही उल्लेख केलेला नाही. या प्रॉपर्टीबाबत रवींद्र वायकर आणि खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत.
भावना गवळी
शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष ट्रस्टचे परिवर्तन महिला उत्कर्ष प्रतिष्ठान प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये केले. हे परिवर्तन करत असताना भावना गवळी यांनी खोटी कागदपत्रे सादर केली. खोटी कागदपत्रे सादर करुन ट्रस्टचे रूपांतर कंपनीमध्ये केले, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. हा घोटाळा जवळपास शंभर कोटींचा असल्याचा अंदाजही किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला.
(हेही वाचाः किरीट सोमय्यांना केंद्राची ‘पॉवर’!)
किशोरी पेडणेकर
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत येणा-या सदनिकांमधून मुंबईतील जवळपास सहा फ्लॅट लाटल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. 2003 साली झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत वरळी मध्ये देण्यात आलेल्या 230 फ्लॅट मधील सहा फ्लॅट किशोरी पेडणेकर यांनी घेतले. यावेळी किशोरी पेडणेकर या प्रभागांमध्ये नगरसेविका होत्या. त्यावेळेस हा अपहार झाल्याचा किरीट सोमय्या यांचा आरोप आहे. तसेच कोविड काळामध्ये महानगरपालिका अंतर्गत कोविड सेंटर उभारण्याच्या कामांमध्ये भ्रष्टाचार केल्याचाही आरोप किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर केला आहे.
यशवंत जाधव आणि यामिनी जाधव
मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि शिवसेना आमदार यामिनी जाधव यांनी दुबईत असलेल्या ‘सिनर्जीत व्हेंचर्स’ आणि ‘सईद डोन शारजा’ या दोन कंपन्या तयार करुन त्यात पैशांची गुंतवणूक केली आहे. या दोन्ही कंपन्या यशवंत जाधव कुटुंबीयांच्या असल्याचा दावाही किरीट सोमय्या यांनी केला आहे. या कंपनीत पैसा लावण्यासाठी प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने जाधव यांना पैसे दिले. प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी कोलकत्ता मधील मनी लॉन्ड्रिंग करणारी कंपनी असल्याचाही आरोप या वेळी किरीट सोमय्या यांनी केला. हा काळा पैसा नेमका यशवंत जाधव आणि आमदार यामिनी जाधव यांनी कोठून आणला? असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला. मुंबई महापालिकेमध्ये कोविड उपचारासाठी जे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते, तसेच इतर बाबतीत जे कॉन्ट्रॅक्ट दिले जातात त्या कॉन्टॅक्टमधून केलेल्या काळा बाजारातून हा पैसा उभा करण्यात आला. त्यानंतर या काळ्या पैशाला मनी लॉन्ड्रिंग करुन दुबईत गुंतवणूक करण्यात आली आहे. दुबईच्या या कंपन्यांमध्ये जवळपास पंधरा कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला आहे.
(हेही वाचाः म्हाडाच्या जागेवर मंत्री अनिल परबांचे बेकायदेशीर बांधकाम! किरीट सोमय्यांची तक्रार )
मिलिंद नार्वेकर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी दापोली समुद्रकिनाऱ्याजवळ अनधिकृत बंगला बांधला असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्याची मंत्रालयात जाऊन भेट घेऊन त्याबाबत सविस्तर माहिती दिली असल्याचं किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीच्या नंतर मिलिंद नार्वेकर यांनी बांधलेला अनधिकृत बंगला पाडला जाईल, असे आश्वासन त्या अधिकाऱ्याकडून देण्यात आलं असल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे. तसेच हा बंगला बांधण्याआधी मिलिंद नार्वेकर यांनी परवानगी घेतली नव्हती.
जितेंद्र आव्हाड
गृहनिर्माण विभागाचा कारभार मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांभाळल्यानंतर गृहनिर्माण विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या निकटची व्यक्ती काही बिल्डरांना हाताशी धरुन मोठा भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. लवकरच याबाबत सबळ पुराव्यासहित पत्रकार परिषद घेऊन आपण सदरचे प्रकरण समोर आणणार असल्याचं किरीट सोमय्या यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.
(हेही वाचाः सोमय्यांनी वाजवले आव्हाडांचे 12)
Join Our WhatsApp Community