माहुलच्या जागेवरील आरक्षण बदलाचा प्रस्ताव घाईघाईत मंजूर: भाजप नगरसेवकांचा अध्यक्षांच्या दालनाबाहेर ठिय्या

99

माहुल येथील पंपिंग स्टेशनकरता खासगी विकासकाकडून घेण्यात आलेल्या जागेवरील आरक्षण उठवण्याचा प्रस्ताव सत्ताधारी शिवसेनेने कोणत्याही प्रकारे चर्चा न करता मंजूर केला. भाजपचे सदस्य या प्रस्तावावरून हल्लाबोल करणार याची कल्पना आल्याने सुधार समिती अध्यक्ष सदा परब यांनी हा प्रस्ताव विना चर्चा मंजूर करत अजमेरा बिल्डरला आपली साथ असल्याचे मनसुबे उघड करून दिले. त्यामुळे याचा निषेध म्हणून भाजपच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या दालनाबाहेरच ठिय्या मारत जोरदार घोषणाबाजी केली.

भाजपच्या मागणीकडे लक्ष न देता प्रस्ताव मंजूर

पंपिंग स्टेशनसाठी महापालिका आणि खासगी विकासकांच्या ताब्यातील जागांच्या अदलाबदलीबाबतच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आल्याने दोन्ही भूखंडाच्या आरक्षणांचे गरजेनुसार फेरबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. खासगी विकासकाला लाभ देण्यासाठी आणि त्या भूखंडावर घरांचे बांधकाम करण्यासाठी यावर असलेले उद्यान, बगीचाचे आरक्षण उठवण्यासाठीचा प्रस्ताव सुधार समितीच्या बैठकीत मंजुरीला आला होता. हा प्रस्ताव आदल्या दिवशी रात्री पाठवल्यानंतर, शुक्रवारी दुपारी झालेल्या बैठकीमध्ये कोणत्याही सदस्यांना बोलू न देता सभेतील कामकाजच पाच मिनिटांमध्ये संपवून सर्व प्रस्तावांवर मंजूरची मोहोर उमटवली. समितीच्या सभेमध्ये हा प्रस्ताव अध्यक्षांनी पुकारताच भाजपचे सदस्य अभिजित सामंत यांच्यासह इतर सदस्यांनी याला विरोध दर्शवत आपल्याला बोलायचे असल्याची परवानगी अध्यक्षांकडे मागितली. परंतु अध्यक्षांनी सदस्यांच्या मागणीकडे लक्ष न देता हा प्रस्ताव मंजूर करत विकासकामांसाठी महापालिकेतील सत्ताधरी पक्ष किती कार्य तत्पर आहे हे दाखवून दिले.

अध्यक्षांच्या दालनाबाहेर ठिय्या

उद्यानाचे आरक्षण उठवण्याचा हा प्रस्ताव कोणत्याही चर्चेविना मंजूर केल्यामुळे भाजपचे अभिजित सामंत, अतुल शाह, स्वप्ना म्हात्रे, शीतल गंभीर, आशा मराठे, रोहन राठोड आदी सदस्यांनी अध्यक्षांच्या दालनाबाहेर ठिय्या धरला. आपल्या सदस्यांनी पुकारलेल्या या आंदोलनाला भाजपच्या नेहला शाह, जोत्स्ना मेहता, रिटा मकवाना, सरीता पाटील, कृष्णवेणी रेड्डी,भालचंद्र शिरसाट आदी सदस्यांनी त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थिती लावली. त्यानंतर भाजपच्यावतीने जोरदार घोषणा करत महापालिका मुख्यालय दणाणून सोडले.

( हेही वाचा : शिवसेना-काँग्रेसमध्ये पडली ठिणगी ‘हे’ आहे कारण! )

प्रस्तावाविरोधात उच्च न्यायालयात जाणार

यानंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना अभिजित सामंत यांनी यापूर्वी जेव्हा माहुलच्या पंपिंग स्टेशनकरता भूखंड अदलाबदलीचा प्रस्ताव आला होता, त्यावेळी भाजपने याला विरोध दर्शवला होता. आता खासगी विकासकाला देण्यात येणाऱ्या भूखंडावरील उदयानाचे आरक्षण उठवण्याचा हा प्रस्ताव होता. हा हरित पट्टा आहे. येथील आरक्षण बदलू शकत नाही. हे नियमबाह्य आरक्षण बदलले जात असून याबाबत समितीच्या सभेत बोलूही न दिल्यामुळे या मंजूर प्रस्तावाविरोधात आपण उच्च न्यायालयात जाणार असल्याचा इशारा सामंत यांनी दिला.

तर सुधार समिती अध्यक्ष सदा परब यांनी यापूर्वी याबाबतच्या भूखंडाच्या अदलाबदलीचा प्रस्ताव मंजूर झाला होता. त्यामुळे नगरविकास खात्यामार्फत याच्या आरक्षणात फेरबदल करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, आता विरोध करणारे भाजपचे नगरसेवक तेव्हा का गप्प होते, असा सवाल परब यांनी केला. आम्हाला मुंबईकरांचे काम करायचे असून त्यासाठी हा प्रस्ताव मंजूर होणे आवश्यक होते. ते करताना असे निर्णय घ्यावे लागतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.