टिपू सुलतान उद्यान नामकरण प्रकरणः भाजप आमदार साटम यांचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र, म्हणाले…

147

मालाडमधील मालवणीतील एका क्रीडा मैदानाचे ‘वीर टिपू सुलतान क्रीडासंकुल’ असे नामकरण करण्यात आले. यामध्ये काँग्रेसचे नेते आणि पालकमंत्री असलम शेख यांचा पुढाकार असून भाजपने यावरून विरोध दर्शवला आहे. दरम्यान, या संकुलाबाहेर भाजपा आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनही केलं. भाजपा आणि बजरंग दलाकडून या नामकरणाला विरोध झाला. टिपू सुलतान उद्यानाच्या नावावरून सुरू असलेल्या वादावर आता भाजप आमदार अमित साटम यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीले आहे.

भाजप आमदार साटम यांची मागणी

मालाडमधील मालवणीतील या क्रीडा मैदानाची जागा ही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी महसूल पत्रकात नोंदवलेली आहे आणि मुंबईचे पालक मंत्री अस्लम शेख हे अवैधरित्या टिपू सुलतान क्रिडांगण बांधत आहेत, इतकेच नाही तर जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा सुद्धा अवैध कामाकरिता गैरवापर करत आहेत, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी अमित साटम यांनी केली आहे.

काय म्हटले साटम यांनी पत्रात…

satam letter

मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख, पत्र लिहताना माझी द्विधा मनस्थिती होत आहे. कारण तुम्हाला मुख्यमंत्री म्हणू की शिवसेना पक्षप्रमुख म्हणून साद घालावी. यामुळेच मी समस्त हिंदूतर्फे तुमच्या दोन्ही पदाला साद घालण्याचे ठरवले. आपल्या महापौर किशोरीताई पेडेणेकर एका बाजूला जाहीरपणे मान्य करतात की टिपू सुलतान क्रिडांगण नामकरणाचा फलक अवैध आहे आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल, तर दुसऱ्या बाजूला त्याचाच बचाव करण्यासाठी खोटे बनावटी दस्ताऐवज वापरतायेत.

वास्तविकतेत जर टिपू सुलतान नामफलक अवैध असले तर महापौरांनी ते उतरवले पाहिजे होते. पण पालक मंत्र्यांच्या बचाव कार्यातच त्या मग्न आहेत. धक्कादायक बाब म्हणजे सदर जागा ही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी महसूल पत्रकात नोंदवलेली आहे आणि पालक मंत्री अवैधरित्या टिपू सुलतान क्रिडांगण बांधतायेत, इतकेच नाही तर जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा सुद्धा अवैध कामाकरिता गैरवापर करतायेत. आपणास नम्र विनंती आहे की, यावर आपण त्वरीत मुख्य सचिवाद्वारे सदर बाबीची सखोल चौकशी करावी आणि गुन्हेगारास दंडीत करावे, ही विनंती अशा आशयाचे पत्र भाजप आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिले आहे.

प्रजासत्ताकदिनी मालाड येथे चक्क टिपू सुलतानाचे नाव दिलेल्या मैदानाचे उद्घाटन करण्यात आल्याने शिवसेनेवर टीकेची झोड उगारण्यात आली आहे.

विश्व हिंदू परिषद आणि भाजपचा विरोध

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने २६ जानेवारी रोजी 18 व्या शतकातील वादग्रस्त म्हैसूर शासक टिपू सुलतानच्या नावावर मुंबईतील क्रीडा संकुलाचे उदघाटन काँग्रेस नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते झाले. या मैदानाला टिपू सुलतानाचे नाव दिल्याने राजकीय वादाला तोंड फुटले आहे. याला विश्व हिंदू परिषद आणि भाजपने विरोध केला आहे. एखाद्या प्रकल्पाचे नाव “क्रूर हिंदूविरोधी” देणे निंदनीय बाब आहे, असे भाजपचे म्हणणे आहे.

मंगळवारी भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी यासंबंधी ट्विट करून सेनेवर टीकास्त्र सोडले. ‘धर्मांध-क्रूरकर्मा-धर्मद्वेषाने हिंदूंची समूह कत्तल करणारा लुटारू आक्रमणकारी राजा टिपू सुलतान याचे महाविकासआघाडीकडून उदात्तीकरण! वीर पराक्रमी अशी विशेषणे देऊन मालाड मालवणी उद्यानाचा नामकरण कार्यक्रम 26 जानेवारीला! , असे म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.