आक्षेपार्ह पोस्ट हॅकरनेच डिलिट केल्याच्या दाव्यामुळे वाढला संभ्रम

129
भाजप आमदार राजहंस सिंह यांचा स्वीय सहाय्यक याचे फेसबुक खाते हॅक करून भाजपचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा व इतर आमदार आणि नेत्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी कुरार व्हीलेज पोलीस ठाण्यात अज्ञात हॅकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हॅकरने हॅक केलेले सोशल खाते परत मिळवण्यासाठी किमान २४ तासांचा कालावधी लागतो, अशी माहिती सायबर तज्ज्ञ पोलीसांनी दिली आहे. अकाऊंट हॅक करुन केलेली आक्षेपार्ह पोस्ट हॅकरनेच डिलिट केल्याचा दावा दिनेश दहिवळकर यांनी केला आहे. मात्र, त्यांच्या या दाव्यामुळे संभ्रम वाढला आहे. कोणत्या विशिष्ट हेतूने हॅकरने ही पोस्ट टाकली असेल, तर मग ती लगेच डिलिट का केली असेल असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भाजपचे तत्कालीन मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्याकडून मुंबई अध्यक्ष पदाचा कार्यभार आमदार आशिष शेलार यांच्याकडे सोपवण्याचा कार्यक्रम दादर कार्यालय येथे रविवारी पार पडला. या कार्यक्रमाला भाजपचे अनेक नेते, खासदार आमदार उपस्थित होते. दरम्यान या कार्यक्रमाची पोस्ट आमदार राजहंस सिंह यांचे स्वीय सहायक दिनेश दहिवळकर यांनी सायंकाळी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून पोस्ट केली होती. मात्र अज्ञात हॅकरने दहिवळकर यांचे फेसबुक खाते हॅक करून या पोस्टमध्ये फेरबदल करून ती पोस्ट आक्षेपार्ह केली असल्याची तक्रार दहिवळकर यांनी कुरार पोलीस ठाण्यात  केली. याप्रकरणी कुरार व्हिलेज पोलिसांनी दिनेश दहिवळकर यांच्या तक्रारीवरून अज्ञात हॅकरविरुद्ध समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणे आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हॅकरनेच हटवली पोस्ट- दहिवळकर

दहिवळकर यांनी तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, त्यांना आमदार राजहंस सिंह यांनी आक्षेपार्ह पोस्टबाबत विचारले. त्यानंतर दहिवळकर यांनी त्यांचे फेसबुक खाते तपासले असता त्यात अशी कुठल्याही प्रकारची पोस्ट आढळून आली नसल्याचे त्यांनी म्हटले. दहिवळकर यांना मोबाईलचा स्क्रीनशॉट काढून पाठवण्यात आल्यानंतर खात्री पटली, परंतु हॅकरने ही पोस्ट तत्काळ दहिवळकर यांच्या फेसबुक खात्यावरून हटवली असल्याचे दहिवळकर यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. परंतु अद्याप हॅकरचा शोध अद्याप लागलेला नसून, मला माझ्या फेसबुक खात्यावर एॅक्सेक्स मिळाला नसल्याचे दिनेश दहिवळकर यांनी हिंदुस्थान पोस्टशी बोलताना सांगितले व पुढे बोलणे त्यांनी टाळले.

( हेही वाचा: नवे शिवसेना भवन, मग जुन्या शिवसेना भवनाचे काय? )

काय म्हणतात सायबर तज्ज्ञ?
याबाबत सायबर तज्ज्ञ पोलीस अधिका-यांकडे  याबाबत जाणून घेतले असता, त्यांनी असे म्हटले आहे की, हॅकरने एखादे सोशल अकाउंट हॅक केल्यानंतर त्यात मूळ खातेदाराला फेसबुक पेज ओपन करता येत नाही, कारण हॅकरने ते हॅक करून पासवर्ड बदलेला असतो.  हे खाते पूर्वपदावर आणण्यासाठी फेसबुककडे विनंती करावी लागते. हे सर्व करण्यासाठी किमान २४ तासांचा अवधी लागतो, असे या अधिकाऱ्याने नाव न देण्याच्या अटीवर सांगितले. एखाद्याचे फेसबुक अथवा इतर सोशल अकाउंट कुठेही बसून हॅक करून त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास आयपी अॅड्रेस अथवा मोबाईल फोनमधून केल्यास हॅकर्सचा मोबाईल क्रमांकावरून त्याचा शोध घेतला जाऊ शकतो.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.