रस्त्यालगत कुठलेही झाड जेव्हा आपल्या फळा फुलांनी मोहित करते, तेव्हा त्या झाडाचे नाव आणि त्याची उपयोगिता जाणून घेण्याची इच्छा मनात प्रकट होते. त्यासाठी प्रत्येक झाडाची माहिती असणे आवश्यक असून जर प्रत्येक झाडाखाली त्या झाडाचे किंवा त्यांच्या प्रजातीचे नाव आणि त्याचा उपयोग आदींची माहिती प्रदर्शित केली जावी अशी मागणी होत आहे. भाजपच्या मुलुंड मधील नगरसेविका रजनी केणी यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व वृक्षांवर त्यांचे नाव, जातीचा प्रकार, अंदाजे वय अशी संबंधित माहिती देणारे फलक लावण्यात यावेत, अशी मागणी केली आहे.
ठरावाच्या सुचनेद्वारे कोणत्या केल्या मागण्या
रजनी केणी यांनी महापालिका सभागृहात ठरावाच्या सुचनेद्वारे केलेल्या या मागणीत, मुंबईत महानगरपालिकेकडून तिच्या हद्दीतील रस्ते, उद्याने, महाविद्यालये, रुग्णालये, इत्यादी ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येते. परंतु त्या ठिकाणी असलेल्या वृक्षांवर त्याचे नाव, जातीचा प्रकार, अंदाजे वय अशी संबंधित माहिती देणारे फलक लावण्यात येत नाहीत.
(हेही वाचा – दिव्यागांना मोफत आणि प्राधान्याने वैद्यकीय उपचार: शिवसेनेची मागणी)
… म्हणून पालिकेने घ्यावा पुढाकार
झाडांसबंधी माहिती असणारे नागरिक त्या झाडावरील फळे-फुले पाहून, त्या झाडाचे नाव, जातीचा प्रकार, इत्यादी माहिती ओळखू शकतात. मात्र, बहुतांश नागरिक झाडांसंबंधीच्या माहितीपासून अनभिज्ञ असतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत वनस्पतीशास्त्राचे ज्ञान अवगत होण्यास हातभार लागण्याकरिता महानगरपालिका प्रशासनाने या कामी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे म्हटले आहे.