महापालिका सभागृहात भाजप चिडीचूप: नेत्यांनी टोचले शिरसाटांचे कान

102

मुंबई महापालिकेत मागील काही दिवसांपासून भाजप आक्रमक आहे. असे असताना मागील गुरुवारी झालेल्या महापालिका सभेमध्ये सुधार समिती आणि स्थायी समितीत मंजूर केलेले सर्व प्रस्ताव तातडीचे कामकाज म्हणून एका रात्रीत पाठवून सत्ताधारी पक्षाने मंजूर केले. मात्र, हे प्रस्ताव मंजूर केले जात असताना भाजपच्या एकाही सदस्यांनी आक्षेप न नोंदवता सत्ताधाऱ्यांना हे प्रस्ताव मंजूर करण्यास मदत केल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे या प्रकारानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत भाजपचे महापालिकेतील प्रभारी आणि प्रवक्ते तथा नामनिर्देशित नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांचे कान टोचल्याचे बोलले जाते. शिरसाट यांच्याकडे महापालिकेतील सुत्रे असताना त्यांनी कोणत्याही प्रकारच्या सूचना नगरसेवकांना दिल्या नाही. त्यावरूनच पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी शिरसाट यांच्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.

भाजपच्या नेत्यांमध्ये नाराजी

मुंबई महापालिकेत भाजपची भीती वाटत असल्याने सत्ताधारी पक्ष आजवर प्रत्यक्ष सभा न घेता ऑनलाईन सभा घेण्यावर भर देत होते. परंतु ऑक्टोबरपासून स्थायी समितीची प्रत्यक्ष सभा आणि नोव्हेंबरपासून महापालिकेची प्रत्यक्ष सभा घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत भाजप आक्रमक झालेला पहायला मिळत आहे. त्यानंतर महापालिकेच्या दुसऱ्या प्रत्यक्ष सभेपासूनही भाजपचे नगरसेवक आक्रमक झालेले पहायला मिळालेले आहे. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना अशाप्रकारे आक्रमकपणा अपेक्षित असतानाच गुरुवारी झालेल्या महापालिका सभेत भाजपच्या एकाही सदस्यांनी तोंड न उघडता सत्ताधारी पक्षाला त्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यास मोकळे रान दिल्याने भाजपच्या मुंबईतील नेत्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली.

१०० हून अधिक तातडीच्या कामकाजाचे प्रस्ताव मांडले

गुरुवारी झालेल्या महापालिका सभेपुढे स्थापत्य शहर आणि उपनगरे समितीच्या माध्यमातून रस्त्यांसह विविध ९५ प्रस्ताव आणि सुधार समितीचे ९ तसेच विधी समितीचे चार याप्रकारे १०० हून अधिक तातडीच्या कामकाजाचे प्रस्ताव बुधवारी रात्री पाठवून गुरुवारच्या सभेपुढे मांडण्यात आले. यामध्ये सुधार समितीच्या मंजूर झालेले दादर-नायगावमधील महापालिकेच्या मालमत्तेचा विकास, महापालिकेच्या भाडेकरारावर दिलेल्या जमिनीवरील उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासात अधिमुल्य आकारणे, भायखळा येथील मालमत्तांच्या भाडेकराराचे नुतनीकरण, दादर नायगाव येथील मोरबाग मालमत्तेचा पुनर्विकास, आर दक्षिणमधील पोयसरमधील स्मशानभूमीच्या जागेसंदर्भात जमीन मालकांशी करारनामा करणे, कुर्ला बाह्मणवाडी येथील हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशनच्या जागेवर तयार मोबाईल किऑस्क भाड्याने देणे, चांदिवलीच्या भूखंडावर प्रकल्पबाधितांसाठी सुमारे ४ हजार सदनिका बांधणे, बांधकाम पूर्ण झाल्यानंतर भूखंडासहित सदनिका संपादित करणे आदी प्रस्ताव महापालिका सभेत मांडण्यात आले होते. परंतु सुधार समितीच्या एकाही प्रस्तावावर भाजपच्या नगरसेवकांनी तोंड उघडले नाही.

(हेही वाचा 2 महिन्यांच्या आजारपणानंतर मुख्यमंत्री आले जनतेसमोर! केली ‘ही’ घोषणा…)

जबाबदारीची जाणीव करून दिली

महापालिकेतील सभांमधील कामकाजात विरोधी करण्याची रणनीती आखण्याची जबाबदारी ही भालचंद्र शिरसाट यांच्यावर असते. भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे व महापालिका पक्षनेते विनोद मिश्रा यांच्यावर वेगळ्या प्रकारची जबाबदारी असली तरी वरिष्ठांकडून येणाऱ्या सूचना नगरसेवकांना देऊन त्याप्रमाणे रणनीती आखण्याचे काम शिरसाट यांचे आहे. परंतु त्यांच्याकडून नगरसेवकांना योग्यप्रकारे सूचना न दिल्या गेल्याने मुंबई भाजपचे नेते नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गुरुवारी रात्री शिरसाट यांची कानउघडणी करत त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिल्याची माहिती मिळत आहे. सत्ताधारी पक्ष बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर करत आहे. भाजपच्या विरोधानंतरही हे प्रस्ताव मंजूर होत असल्याने बऱ्याच प्रस्तावांबाबत भाजपने न्यायालयांमध्ये धाव घेतली आहे. विरोधी पक्ष हा सत्ताधारी पक्षाच्या दावणीला बांधल्याने विरोधी पक्षाची भूमिका पहारेकरी म्हणून पार पाडत आहे. हे जनतेला ज्ञात व्हावे आणि जर विरोधानंतरही प्रस्ताव मंजूर केल्यास त्याविरोधात न्यायालयात धाव घेता येते. त्यामुळे भाजपचा विरोध हा पटलावर नोंदवणे आवश्यक आहे, पण तोच विरोध न नोंदवला गेल्याने तातडीने प्रस्ताव आणून सत्ताधारी पक्षाने ते मंजूर केल्याने ही नाराजी अधिक उफाळून आली आहे. त्यामुळे शिरसाट यांच्याबरोबर गटनेते प्रभाकर शिंदे आणि पक्षनेते विनोद मिश्रा यांनाही समज दिल्याची चर्चा भाजपच्या गोटामध्ये ऐकायला मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.