मुंबई भाजपच्यावतीने मराठी दांडिया आयोजित करण्यात आला असून शुक्रवार, 30 सप्टेंबरपासून काळाचौकी येथील शहीद भगतसिंह मैदानावर होणाऱ्या या दांडियात चक्क आय फोन जिंकण्याची संधी गरबा रसिकांना मिळणार आहे. या दांडियात जो स्पर्धक मराठमोळी वेशभुषा करून येईल, त्यातील सर्वोत्तम वेशभूषा करणाऱ्या पहिल्या दोन स्पर्धकांना प्रत्येकी एक-एक आयफोन इलेव्हन फोन बक्षिस म्हणून दिला जाणार आहे. या दांडियाचे आयोजक असलेल्या मुंबई भाजपने याची अधिकृत घोषणा केलेली आहे. त्यामुळे संस्कृतीची जपणूक करणाऱ्या मराठ्मोळ्या दांडियात खऱ्या अर्थाने मराठीचाच साजश्रुंगार पहायला मिळेल, अशा प्रकारचा विश्वास आयोजकांकडून व्यक्त होत आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने मागील दोन वर्षांपासून सुरु असलेले सण-उत्सवांवरील निर्बंध हटवले. त्यामुळे दहीहंडी, गणेशोत्सवानंतर आता नवरात्रौत्सव मोठ्या धुमधडाक्यात सुरु आहे. मात्र या सर्व उत्सवांचा राजकीय लाभ सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटाला होऊ लागला आहे. मुंबईत सध्या सगळ्याच राजकीय पक्षांना मुंबई महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजकीय फायदा मिळवताना भाजपाने मराठी भाषिकांना आकर्षित करण्यासाठी अफलातून प्रयोग केला आहे. भाजपाने चक्क मराठी दांडियाची घोषणा केली आहे.
( हेही वाचा : मुंबई महापालिका कर्मचा-यांची ‘दिवाळी’! सरकारने जाहीर केला घसघशीत बोनस )
सर्वोत्तम वेषभूषाकाराला आयफोन मोबाईल
मुंबई भाजपच्या वतीने येत्या ३० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये मराठी दांडिया महोत्सव आयोजित केला आहे. काळाचौकी येथील शहीद भगतसिंह मैदानावर पार पडणाऱ्या आदिशक्तीच्या उत्सवात मराठी मनाचा जागर होणार होणार आहे. त्यामुळे मराठी दांडीया रसिक, प्रेमींसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या भाजपने दांडियातील गुजरातील पेहरावाऐवजी मराठमोळ्या पेहरावाचा वापर व्हावा यासाठी विशेष काळजी घेतलेली दिसून येत आहे. यासाठी अधिकाधिक दांडिया रसिकांनी मराठी पेहरावाचा वापर करावा यासाठी आयोजकांनी वेषभुषा स्पर्धेचेही आयोजन केले आहे. त्यामुळे या दांडियामध्ये मराठी वेशभूषा करून येणाऱ्या दांडिया रसिकांपैकी सर्वोत्तम वेषभूषाकाराला आयफोन मोबाईलची भेट दिली जाणार आहे. यामध्ये सर्वोकृष्ट वेशभूषेसाठी एक विजेता आणि एक विजेती यांची निवड करून त्यांना प्रत्येकी आयफोनची भेट बक्षिस म्हणून दिली जाणार आहे.
Join Our WhatsApp Community