भाजपाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने देशभर जो सेवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने मुंबईत भाजपा नालेसफाईच्या कामाची पाहणी व देखरेख अभियान राबवून मुंबईकरांची सेवा करणार असल्याचे भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी मंगळवारी जाहीर केले. त्यामुळे महापलिकेत प्रशासक नियुक्त असले तरीही मुंबईचे रखवालदार म्हणून नाल्यांच्या सफाई कामांवर जागता पहारा देत मुंबईकरांची सेवा केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
भाजपा देशातील सर्वात मोठा सेवाकार्य करणारा पक्ष
६ एप्रिल हा भाजपाचा स्थापना दिन असून या निमित्ताने एक व्यापक कार्यक्रम देश पातळीवर हाती घेण्यात आला आहे. भाजपा हा देशातील सर्वात मोठा सेवाकार्य करणारा पक्ष असून जमिनीवर काम करणारा तसेच महाराष्ट्रात सर्वात जास्त जनसमर्थन मिळालेला पक्ष आहे. म्हणून ६ एप्रिलला मुंबईतील प्रत्येक शक्ती केंद्रावर भाजपातर्फे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती शेलार यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. सकाळी पावणे दहाच्या दरम्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपा पक्ष कार्यकर्ते आणि जनतेला जाहीर संबोधित करणार आहेत. मुंबईत १५०० पेक्षा जास्त ठिकाणी या निमित्ताने सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून ६ एप्रिल ते १४ एप्रिल हा सप्ताह सेवा सप्ताह म्हणून भाजपा देश पातळीवर साजरा करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
(हेही वाचा -पवारांचं आडनाव आगलावे करा; सदाभाऊंची टीका )
जर नालेसफाई योग्य वेळी पूर्ण झाली नाही तर
या निमित्ताने मुंबईतही भाजपा कार्यकर्ते मोठया संख्येने मुंबईकरांची सेवा करणार असून आजच्या घडीला मुंबईकरांच्या दृष्टीने महत्वाचा विषय हा नालेसफाई असून जर नालेसफाई योग्य वेळी पूर्ण झाली नाही तर मुंबईकरांना येत्या पावसात दरवर्षी प्रमाणे पुराला सामोरे जावे लागेल. म्हणून या सेवा सप्ताहाच्या निमित्ताने मुंबई भाजपाचे सर्व पदाधिकारी मुंबईतील छोटया मोठया सर्व नाल्यांवर जाऊन नालेसफाईच्या कामाची देखरेख व पाहणी आणि सुरूवात याबाबत अभियान राबविणार आहे. दुदैवाने मुंबईत अजूनही नालेसफाईच्या कामांना सुरूवात झालेली नाही. सत्ताधारी शिवसेना पळ काढून हात झटकून निघून गेले आहेत. तर प्रशासक अद्याप कामांबाबत निर्णय घेऊ शकलेले नाहीत. ते हातावर हात ठेवून बसले आहेत. भाजपा या दोघांना ही मुंबईकरांच्या या महत्वाच्या जबादारीतून पळ काढू देणार नाही. त्यासाठी सेवा सप्ताहच्या निमित्ताने भाजपा नालेसफाई पाहणी अभियान राबविणार असल्याची माहिती आमदार अॅड आशिष शेलार यांनी यावेळी दिली.
यंदा महामानवाची जयंती कार्यक्रम सर्वत्र
१४ एप्रिलला भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभर साजरी होणार असून भाजपाच्या स्थापना दिना निमित्ताने आयोजित सेवा सप्ताहाचा समारोप करताना भाजपातर्फे मुबईत सर्वत्र महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे कार्यक्रमही मोठया प्रमाणात साजरे करणार असल्याचे आमदार अॅड आशिष शेलार यांनी यावेळी जाहीर केले.
Join Our WhatsApp Community