बेस्ट उपक्रमातर्फे शहरांमध्ये सुरु करण्यात आलेल्या वातानुकूलित इलेक्ट्रिक दुमजली बसगाड्या आता मुंबईच्या उपनगरातही चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच बेस्टच्या १० वातानुकूलित इलेक्ट्रिक दुमजली बसगाड्या कुर्ला, बी.के.सी. या भागांत रस्त्यावर आणल्या जाणार आहेत. कुर्ला बीकेसी (BKC) ते वांद्रे या दरम्यान विनावातानुकूलित दुमजली बसगाडी धावत होत्या, परंतु या बसेस मोडीत निघाल्याने उपनगरांमध्ये मुख्यतः कुर्ला, बी.के.सी. या भागात राहणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमातर्फे या भागात वातानुकूलित इलेक्ट्रिक दुमजली बसगाड्या चालविण्यात येणार असल्याचे उपक्रमाने स्पष्ट केले आहे.
बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात २१ फेब्रुवारी २०२३ पासून वातानुकूलित इलेक्ट्रिक दुमजली बसगाड्या समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यामध्ये सध्या एकूण ३९ इलेक्ट्रिक दुमजली बसगाड्या दाखल झाल्या असून त्यापैकी २० बसगाड्या शहरातील दक्षिण मुंबईत सुरु आहेत. व १० बसगाड्या मुंबई उपनगरामध्ये सुरु करण्यात येणार असून उर्वरित ९ गाड्या टप्याटप्याने मुंबई उपनगरांमध्ये रस्त्यावर आणल्या जातील, असे उपक्रमाने म्हटले आहे.
या बसगाड्यांमधून कोणत्याही प्रकारचे ध्वनी किंवा वायु प्रदुषण होत नाहीत. या बसमध्ये दोन्ही बाजूने स्वयंचलित प्रवेशद्वारे असल्याने प्रवाशांसाठी मोठी सुविधा उपलब्ध होत आहे तसेच प्रवाशांच्या सुरक्षेच्य दृष्टीने बसमध्ये सीसीटिव्ही आणि मोबाइल चार्जिंगची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. बस पुरवठादार ‘स्वीच मोबिलीटी’ या संस्थेला एकूण २०० वातानुकूलित इलेक्ट्रिक दुमजली पुरवठा करण्याचे कार्यादेश देण्यात आले आहेत. यापैकी ३९ बसगाड्या याआधीच प्राप्त झाल्या आहेत. उर्वरित बसगाड्या मार्च २०२४ अखेरपर्यंत प्राप्त होणार आहेत. या २०० वातानुकूलित इलेक्ट्रिक दुमजली बसगाड्यांची सेवा मुंबईतील १२ बस आगारांतून सुरु करण्यात येईल.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community