पंजाबमधील लुधियाना येथील जिल्हा न्यायालयात स्फोट झाला असून या स्फोटात दोन जण ठार तर कित्येक जण गंभीर जखमी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी दुपारी साडेबारा वाजेच्यादरम्यान हा भीषण स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, त्यामुळे न्यायालयात ज्या ठिकाणी स्फोट झाला तेथील भितींना तडा गेला, तर काही खिडक्यांच्या काचा देखील फुटल्यात. न्यायालयाच्या दुसऱ्या मजल्यावर हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती असून हा स्फोट कसा झाला? यासाठी जबाबदार कोण? यासंदर्भात कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही.
Punjab | Several feared injured in explosion in Ludhiana District Court Complex
Details awaited. pic.twitter.com/H3jaqit93H
— ANI (@ANI) December 23, 2021
लोकांमध्ये भीतीचे वातावरण
लुधियाना न्यायालयाच्या कॉपी ब्राँचमध्ये हा स्फोट झाला. वकिलांच्या संपामुळे न्यायालयाच्या आवारात फारशी गर्दी नव्हती. या स्फोटामुळे मात्र लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर मात्र पोलीस प्रशासनाकडून, अधिकाऱ्यांकडून या स्फोटासंदर्भात कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तसेच, लुधियानाचे पोलीस कमिश्नर गुरप्रीत सिंह भुलर म्हणाले की, “या घटनेचा तपास सुरु आहे. हा स्फोट न्यायालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील बाथरुममध्ये झाला आहे. बाथरुमच्या बाजूलाच रेकॉर्ड रुम होती.”
(हेही वाचा –भांडुप नवजात बालमृत्यू प्रकरण: सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, भाजपची मागणी)
देशविरोधी शक्तींकडून घृणास्पद कृत्ये सुरू
न्यायालयातील भीषण स्फोट झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने हा परिसर बंद करण्यात आला आणि अग्निशमन विभागाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. यावेळी न्यायालयाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या स्वच्छतागृहात हा स्फोट झाला असल्याचे सांगितले जात आहे. स्फोटाबाबत पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी म्हणाले, ”मी घटनास्थळाचा आढावा घेण्यासाठी लुधियानाला जात आहे, निवडणुका जवळ येत असताना काही देशविरोधी शक्तींकडून अशी घृणास्पद कृत्ये केली जात आहेत. याबाबत सरकारसह लोकांनीही जागृत राहावे.”