बिबट्याला बिबट्याकडून रक्तदान…देशातील पहिलीच घटना

बिबट्याच्या बछड्याला जगवण्यासाठी पुण्यात एका बिबट्याच्या बछड्याचे रक्त दुसऱ्या बिबट्याच्या बछड्याला देण्यात आले. देशात बिबट्याने दुस-या बिबट्याला रक्तदान केल्याची ही पहिलीच घटना आहे. १३ जून रोजी तीन महिन्यांच्या बिबट्याच्या बछड्याला दुस-या तीन महिन्यांच्याच बछड्याकडून रक्त दिले गेले. बिबट्याची प्रकृती स्थिर असून, त्याची देखभाल सुरु असल्याची माहिती पुण्याच्या आरईएसक्यू वाईल्डलाईफ ट्रीटमेंट ट्रान्सिट सेंटर या प्राणीप्रेमी संस्थेच्यावतीने दिली गेली.

( हेही वाचा : विदर्भाला नैऋत्य मोसमी पावसाची प्रतीक्षा)

दोन मादी बछडे नाशकातून पुण्यातील आरईएसक्यू वाईल्डलाईफ ट्रीटमेंट ट्रान्सिट सेंटरकडे उपचारासाठी वनविभागाने दिली होती. दोन्ही बछड्यांना अवैधरित्या पिंज-यात डांबण्यात आले होते. तिथून सुटका करत वनविभागाने दोन्ही बहिणींची रवानगी पुण्यातील प्राणीप्रेमी संस्थेकडे केली. त्यापैकी एका बछड्याच्या शरीरात कमकुवतपणा असल्याचे तपासणीअंती पशुवैद्यकीय अधिका-यांना आढळले. तिच्या शरीरावर फंगल संसर्गही झाला होता. रक्ताच्या कमतरतेमुळे या बछड्याचा जीव जाण्याचीही भीती होती. या तीन महिन्यांच्या मादी बछड्याचा जीव वाचवण्यासाठी संस्थेकडे अगोदरपासूनच दाखल असलेल्या तीन महिन्यांच्या मादी बछड्याचे रक्त घेत तिच्या शरीरात देण्याचा निर्णय घेतला गेला. रक्तदान प्रक्रियेसाठी आवश्यक परवानगी घेतल्यानंतर १३ जून रोजी संसर्ग झालेल्या मादी बछड्याला रक्तदान केले गेले. रक्तदाता मादी बछडा आणि रक्तदान केलेला बछडा दोन्ही व्यवस्थित असल्याची माहिती संस्थेच्या प्रमुख नेहा पंचमिया यांनी दिली. त्यांच्या तब्येतीवर पशुवैद्यकीय डॉक्टरांची टीम लक्ष ठेवून असल्याचेही त्या म्हणाल्या.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here