पूर्व मुक्त मार्गाच्या दोन्ही बाजुला आता १० मीटरचा सर्व्हिस राेड; आर.के.मधानी कंपनीचा पुन्हा महापालिकेत प्रवेश

138

एमएमआरडीएकडून महापालिकेच्या ताब्यात आलेल्या पूर्व मुक्त मार्गाच्या (ईस्टर्न फ्रि वे) दोन्ही बाजुने आता रस्त्यांची रुंदी वाढवली जाणार आहे. या मार्गाच्या भक्ती पार्क कॉम्प्लेक्स ते जिजामाता चौक दरम्यान सेवा रस्त्यांची (सर्व्हिस रोड) सुधारणा केली जाणार असून या दोन्ही बाजुला रस्ता आता १० मीटर रुंद केला जाणार आहे. याचे काम लवकरच महापालिकेच्या माध्यमातून हाती घेतले जाणार आहे.  विशेष म्हणजे या रस्त्यांच्या रुंदीकरणाच्या कामांसाठी रस्ते घोटाळ्या प्रकरणी काळ्या यादीत टाकलेल्या परंतु त्यांच्या शिक्षेची काही वर्षे माफ केलेल्या आर.के.मधानी या कंपनीची या कामांसाठी निवड करण्यात आली आहे.

मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मे २०१५ मध्ये पूर्व मुक्त मार्ग अर्थात ईस्टर्न फ्रि वेचे बांधकाम करून पुढील देखभालीसाठी महापालिकेच्या पूल विभागाला हस्तांतरित केले होते. या रस्त्याच्या भक्ती पार्क वसाहत ते जिजामाता चौक या दरम्यान या पूर्व मुक्त मार्गाची रुंदी ६० मीटरऐवजी ४० एवढी असून २०३४च्या विकास नियोजन नियमावलीनुसार पूर्व मुक्त मार्गाच्या दोन्ही बाजुला १० मीटर रुंदीच्या रस्त्याचे बांधकाम करणे आवश्यक आहे.

एमएमआरडीए वसाहत ते भक्ती पार्क वसाहत यांना जोडणाऱ्या भुयारी मार्गाची उंची कमी आहे. आणीबाणीच्या प्रसंगात रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या या भुयारी मार्गामधून जाणे शक्य नाही. त्यामुळे पूर्व मुक्त मार्गाच्या दोन्ही बाजुने सेवा रस्त्यांचे बांधकाम करणे क्रमप्राप्त असल्याने या रस्त्यांची सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मागवलेल्या निविदांमध्ये काळ्या यादीत टाकलेल्या आणि त्यांची शिक्षा माफ केलेल्या आर.पी.शाह इन्फ्राप्रोजेक्ट, आर.के. मधानी आणि कंपनी तसेच एम. ई. इन्फ्रोप्रोजेक्ट कंपनी आदी तीन कंपन्यांनी भाग घेतला होता. यामध्ये महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा १५ टक्के कमी दरात बोली लावून आर.के.मधानी आणि कंपनी ही कंपनी पात्र ठरली आहे.

( हेही वाचा: उद्धवसेनेवर आता लाल रंगाची झालर; भाजपाची बोचरी टीका )

मधानी आणि कंपनीला या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम विविध करांसह ६१ कोटी रुपयांना देण्यात येत आहे. भक्तीपार्क कॉम्प्लेक्स ते जिजामाता चौक दरम्यानच्या पुलाची लांबी १४० मीटर लांब असून पुलाची रुंदी  ६ ते ८.६३ मीटर एवढी आहे. १४ स्पॅनमध्ये आणि १४ पियरमध्ये हे बांधकाम असून सेवा रस्त्यांची लांबी एक हजार मीटर अधिक एक हजार मीटर एवढी आहे, तर सेवा रस्त्यांची रुंदी ही १४ मीटर अधिक १७ मीटर एवढी आहे. या कामांसाठी टीपीएफ इंजिनिअरींग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. या सल्लागार सेवेसाठी टीपीएफ या कंपनीला ८४ लाख ७५ हजार एवढे शुल्क मंजूर करण्यात आले आहे. प्रशासनाने हा प्रस्ताव मंजूर केला असून रस्ते कामांमध्ये काळ्या यादीत टाकल्यानंतर आर. के. मधानी या कंपनीचे दरवाजे बंद केले होते. परंतु त्यांना केलेल्या शिक्षेचा कालावधी कमी केल्यामुळे पुन्हा एकदा ते महापालिकेत काम घेण्यासाठी तयार झाले असून काळ्या यादीत टाकलेल्या कंपनीला निविदेत भाग घ्यायला भाग पाडून स्पर्धात्मक निविदा दाखवून हे काम मधानी यांनी आपल्या झोळीत टाकून घेतले. त्यामुळे या कामाच्या माध्यमातून मधानी कंपनीने पुन्हा एकदा महापालिकेत प्रवेश केल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे रस्ते कामांमध्ये यापूर्वी ज्या कंपन्यांना काळ्या यादीत टाकले होते आणि त्यांची शिक्षा कमी केल्यानंतर यातील जे.कुमार, आर.पी. शाह इन्फ्रोप्रोजेक्ट कंपनीबरोबरच आता मधानी यांनीही पुन्हा महापालिकेची कामे मिळवण्यास सुरुवात केल्याने पुन्हा एकदा या जुन्या कंत्राटदार कंपन्यांची लॉबी महापालिकेत सक्रीय झाल्याचे पहायला मिळणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.