मुंबईत मागील दोन वर्षांपासून पदपथांच्या सुधारणांची कामे पूर्णपणे ठप्प झाली असून ना पदपथांची सुधारणा केली जात ना पदपथांची योग्यप्रकारे देखभाल केली जात. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर रस्ते पदपथांचा आणि स्ट्रिट फर्निचरच्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारची कामे न झाल्याने या कामांमध्ये महापालिकेला अपयश आले आहे. हे अपयश धुवून काढण्यासाठी आता राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे उपनगरातील काही प्रमुख रस्त्यांच्या पदपथांचे सुशोभिकरण करण्यासाठी सरकारच्यावतीने पालकमंत्र्यांनी सुमारे ३६ कोटींचा निधी महापालिकेला मंजूर केला आहे. त्यातून प्रामुख्याने भाजपचे आमदार आणि नगरसेवक असलेल्या भागांमध्ये पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून सरकारच्यावतीने आणि महापालिकेच्या माध्यमातून पदपथांच्या सुधारणांची कामे करत निवडणूकीची पेरणी करण्यास सुरुवात केली आहे.
( हेही वाचा : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! ‘या’ भागात पाणीपुरवठा बंद! )
३५.९० कोटींचा निधी महापालिकेला मंजूर
मुंबईतील अंधेरी-घाटकोपर जोड रस्त्यांचे नाविन्यपूर्ण पध्दतीने सौंदर्यीकरण करण्यासाठी व मुंबई उपनगरांतील ५ चौकांचे सौंदर्यीकरण करण्यासाठी वर्ल्ड रिसोर्स इंस्ट्रीटयूट इंडिया अर्थात डब्ल्यू आर आय यांना महापालिकेच्या नियोजन विभागाला उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ही कामे जिल्हा नियोजन समिती निधीतून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी उपनगराचे जिल्हाधिकारी यांनी महापालिकेला या कामांसाठी ३५.९० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून पश्चिम द्रुतगती मार्ग मेट्रो ते साकीनाका जंक्शन या अंधेरी-घाटकोपर जोड रस्ता यासह पाच जंक्शनवरील पदपथांची सुधारणा आणि सुशोभिकरणाचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी महापालिकेच्या नियोजन विभागाच्यावतीने मागवलेल्या निविदेमध्ये देव इंजिनिअर्स ही कंपनी पात्र ठरली असून या कंपनीला या कामांसाठी विविध करांसह २२ कोटी ६३ लाख रुपय खर्च केले जाणार आहे. यामध्ये पादचाऱ्यांची सुरक्षितता आणि सुरळीत वाहतुकीची व्यवस्था केली जाईल. तसेच रस्त्याच्या कडेला हिरवळ निर्माण केली जाणार आहे.
( हेही वाचा : महापालिकेच्या ताफ्यात आणखी दोन यांत्रिक झाडू! )
असे असणार पदपथांची सुधारणा आणि सुशोभिकरण
- लँडस्केपिंग आणि वृक्षारोपणाची कामे तसेच बागाईत कामे केली जाणार आहेत. पदपथांवर स्ट्रीट फर्निचर, बेंचेस, बोलाडर्स, फोन बॉक्सेस, सार्वजनिक शौचालये, सार्वजनिक शिल्पे, कचऱ्याचे डबे बसवले जाणार आहेत.
- पादचाऱ्यांना रस्ता क्रॉसिंग करता लेन मार्किंग, कर्ब आणि मध्यवती कडा, पार्किंग कडा, बस बेज, रस्त्यांवर थर्मोप्लास्टिक पेंट
- पदपथांची उंची वाढवून रस्त्यावर चारचाकी व दुचाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था
- अंधेरी-घाटकोपर जोड रस्ता (पश्चिम द्रुतगती मार्ग मेट्रो ते साकीनाका जंक्शन)
- जुहू-विलेपार्ले जंक्शन, जुहू
- जोगेश्वरी-विक्रोळी आणि साकी विहार रोड जंक्शन, अंधेरी
- साई स्टार जंक्शन, कांदिवली
- एम.जी. रोड आणि साकी विहार जंक्शन मथुरादास पर्यंत व साकी विहार जंक्शन, कांदिवली
- आर्यसमाज चौक,मुलुंड