मराठी भाषिकांना उद्योग, शिक्षण, नोकरीसह विविध क्षेत्रांत आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्यासाठी कार्यरत असणाऱ्या गर्जे मराठी या सेवाभावी संस्थेच्या ‘इच वुमन चॅम्पियन’ या उपक्रमाचे उद्घाटन मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तथा मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, गर्जे मराठीचे संस्थापक आणि अध्यक्ष आनंद गानू, सहसंस्थापक संजीव ब्रह्मे उपस्थित होते.
या उपक्रमाचे कौतुक करताना त्या म्हणाल्या, जगाच्या वेगवेगळ्या देशांत महाराष्ट्राची छोटी रुपे लखलखताहेत, त्यांचे दर्शन गर्जे मराठीने घडवले. अशा मंडळींच्या मेळाव्यात उपस्थित राहण्याची संधी मिळणे, हे मी माझे भाग्य समजते. जगाच्या कानाकोपऱ्यात इतके मराठी उद्योजक आहेत, याबद्दल माहिती नव्हती. या संस्थेच्या सहवासात आल्यानंतर त्याची प्रचिती आली, असेही त्यांनी सांगितले.
…तरच महिला सक्षम होतील
महिला सशक्तीकरणाविषयी भाष्य करताना भिडे म्हणाल्या, कुठल्याही परीक्षांचे निकाल पहा, त्यात महिलाच पुढे दिसतील. पण काही अपवाद वगळता सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात त्या आजही पिछाडीवर असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरण ही काळाची गरज आहे. संख्यात्मकता आणि गुणात्मकता पाहिल्यास पुरुषांच्या तुलनेत आजही स्त्रियांना तितक्याशा संधी मिळत नाहीत.
उदाहरणादाखल कौटुंबिक जीवन वा राजकारण घ्या, तिकडेही हेच चित्र दिसेल. आर्थिक क्षेत्रात ही दरी आणखी रुंदावलेली दिसते. ती मिटवता आली तरच खऱ्या अर्थाने महिलांचे सक्षमीकरण झाले आहे, असे आपण म्हणू शकू, असेही भिडे यांनी स्पष्ट केले.
महिला सबलीकरणासाठी व्यापक प्रयत्न व्हावेत
नोकऱ्यांमध्ये महिलांना सहजासहजी प्रवेश मिळत असला, तरी उद्योग क्षेत्रात त्यांना तसा प्रवेश मिळत नाही. सर्वसामान्य नोकऱ्यांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण असले, तरी शासकीय पदांमध्ये हे प्रमाण आजही कमी आहे. त्यामुळे सूक्ष्म पातळीवरून महिला सबलीकरणासाठी प्रयत्न झाल्यास, त्याला व्यापक यश मिळू शकेल. महिला सक्षमीकरणासोबत नेतृत्त्वगुणांचाही विकास करण्याची गरज आहे. त्यासाठी गर्जे मराठी सारख्या संस्थांनी स्त्रियांशी संवाद साधता येईल अशाप्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करुन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
Join Our WhatsApp Community