मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीने राखून ठेवलेल्या १२३ प्रस्तावांपैंकी सुमारे २५ प्रस्तावांना मान्यता दिल्यानंतर आणखी ४० प्रस्तावांना प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी बुधवारी मान्यता दिली आहे. तसेच येत्या ४० प्रस्तावांना येत्या सोमवारी मान्यता दिली जाणार असून टप्याटप्याने मंजूर केल्या जाणाऱ्या या प्रस्तावांमुळे प्रशासकाची भूमिकाच संदिग्ध वाटू लागली आहे. आयुक्त म्हणून स्वत: मंजूर केलेले प्रस्ताव प्रशासक म्हणून मंजूर करताना वेळ काढूपणा का असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
४० प्रस्ताव मंजूर
कोरोनावर केलेल्या खर्चांचे प्रस्तावांसह डी विभागातील घास गल्लीतील यानगृहाच्या इमारतीची दुरुस्ती, पुढील दोन वर्षांमध्ये सखल भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी बसवण्यात येणारे पंप, शहरातील विद्यमान पुलांची रंगरंगोटी, नायर दंत रुग्णालयाकरता इलेक्ट्रीकली ऑपरेटेड डेंटल चेअर्स आणि युनिट यंत्राचा पुरवठा, बोमनजी पेटीट रस्त्यापासून उमर पार्कमधील आरसीसी पाईपची पर्जन्य जलवाहिनी टाकणे, रुग्णालयांना कडधान्य पुरवणे, पूर्वमुक्त मार्गावर बोगद्यापासून भक्ति पार्क दरम्यान खडबडीत काँक्रिट पॅचेस पुनर्वसन, पवई तलावातील कारंजांची देखभाल, शहर, पूर्व व पश्चिम उपनगरांमधील विविध ठिकाणी पूल व मोऱ्यांची दुरुस्ती तसेच शहर, पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरांमधील गाळ काढून वाहून नेण्याचे अशाप्रकारे ४० प्रस्ताव बुधवारी संमत केले आहे. तर उर्वरीत पैकी ४० प्रस्तावही प्रशासकांच्या मंजुरीसाठी येत्या सोमवारी सादर केले जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळत आहे.
( हेही वाचा : मिठी नदीची पाहणी करून आयुक्तांनी रंगवले नालेसफाईचे चित्र )
त्यामुळे सोमवारी ४० प्रस्तावांना मंजुरी दिल्यास प्रशासनाच्या पुढे केवळ २० ते २३ प्रस्ताव शिल्लक राहणार आहे. त्यामुळे सोमवारनंतर उर्वरीत प्रस्तावांवरही प्रशासन निर्णय घेत स्थायी समितीने राखून ठेवलेले सर्वच प्रस्ताव निकालात काढतील,असे बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community