सुशोभिकरण की कंत्राटदारांचे खिसेभरण: केवळ १३ स्कायवॉकच्या विद्युत रोषणाईवर ७४ कोटी रुपयांचा खर्च

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून मुंबई सौंदर्यीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला असून याअंतर्गत मुंबईतील विविध महत्वाच्या भागांमध्ये विद्युत रोषणाई करून मुंबई सुशोभित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानुसार मुंबईतील १३ स्कायवॉक सुशोभित करण्याच्यादृष्टीकोनातून त्यावर कायमस्वरुपी विद्युत रोषणाई केली जाणार आहे. या १३ स्कायवॉकच्या विद्युत रोषणाईवर केला जाणाऱ्या खर्चाचा आकडा पाहून सर्वसामान्य जनतेलाही भोवळ येईल. या स्कायवॉकच्या विद्युत रोषणाईवर थोडेथोडके नव्हे तर तब्बल ७४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. म्हणजे सरासरी साडेपाच कोटी रुपये एका स्कायवॉकच्या रोषणाईवर खर्च केले जाणार असून एवढया खर्चाच्या दुरुस्तीचेही काम केले जात नाही. त्यामुळे हे सुशोभिकरण आहे की कंत्राटदारांचे खिसेभरण आहे, असा प्रश्न मुंबईकरांना पडू शकतो.

मुंबईचे सौंदर्य वाढण्यासाठी शहर आणि उपनगरातील आकाश मार्गिकांचे सुशोभिकरण करून मुंबईत झगमगाट करताना स्कायवॉकही लख्ख प्रकाशाने न्हाऊन टाकले जाणार आहे. यासाठी मुंबई महापालिकेने शहरातील शीव, वडाळा, कॉटन ग्रीन, पूर्व उपनगरांमधील घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम आणि भांडुप तसेच पश्चिम उपनगरांमधील बोरीवली, अंधेरी पूर्व, सांताक्रुझ पूर्व, सांताक्रुझ पश्चिम, गोरेगाव, विलेपार्ले आदी स्कायवॉकच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेतले आहे. या सुशोभिकरणासाठी चार टप्प्यात कामे विभागून कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये काम पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षांचा हमी कालावधी आणि पुढील तीन वर्षांची देखभाल आदींचा सामावेश करून खर्च केला जाणार आहे.

( हेही वाचा: ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील १७९ पदभरती रद्द )

कंत्राटदारांचे संगनमत?

विशेष म्हणजे गट क्रमांक १ आणि ४ च्या कामांसाठी इलेक्ट्रोकुल इंजिनिअरींग पात्र ठरली, परंतु त्यांनी गट क्रमांक २ व ३मध्ये निविदाच भरली नाही. त्याचप्रमाणे इलेक्ट्रोकुल इंजिनिअरींग कंपनीने गट क्रमांक १ व ४ मध्ये निविदा भरली नाही. उलट या चारही गटांमध्ये मेसर्स एल्प्रोज इंजिनिअर्स, मेसर्स एमएस मॅक एन्विरोटेक अँड सोल्युशन या दोन्ही कंपन्यांनी भाग घेतला होता. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांना नावाला निविदा भरायला लावून स्पर्धात्मक निविदा झाल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला की काय असा प्रश्न निर्माण होतो. विशेष म्हणजे महापालिकेतील परंपरागत असलेल्या शिवम कॉर्पोरेशन, स्टार इलेक्ट्रीक आणि साई इलेक्ट्रीकल अँड इंजिनिअरींग या कंपन्या बाद ठरल्या. त्यामुळे या कंपन्यांना बाजुला ठेवून या केवळ दोन कंपन्यांना कोट्यवधी रुपयांचे काम देण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट होत आहे.

कशाप्रकारे असणार विद्युत रोषणाई?

 • एलईडी स्ट्रीप लाईट आणि बॅटन ट्यूब लाईट फिटींग
 • फ्लड लाईट फिटींग पुरवठा आणि त्यांची उभारणी

स्कायवॉकसाठी रोषणाईसाठी नियुक्त कंत्राटदार व होणारा खर्च

 • स्कायवॉक : बोरीवली, अंधेरी
 • कंत्राटदाराचे नाव : इलेक्ट्रोकुल इंजिनिअरींग
 • होणारा खर्च : १८.७९ कोटी रुपये

स्कायवॉक : गोरेगाव, सांताक्रूझ पूर्व, सांताक्रूझ पश्चिम,विलेपार्ले

 • कंत्राटदाराचे नाव : एएससी पॉवर प्रायव्हेट लिमिटेड
 • होणारा खर्च : १६.५२ कोटी रुपये

स्कायवॉक : घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, भांडुप, शीव

 • कंत्राटदाराचे नाव : एएससी पॉवर प्रायव्हेट लिमिटेड
 • होणारा खर्च :  १६.९५ कोटी रुपये

स्कायवॉक : कॉटन ग्रीन, नाना चौक, वडाळा

 • कंत्राटदाराचे नाव : इलेक्ट्रोकुल इंजिनिअरींग
 • होणारा खर्च : १५.६९ कोटी रुपये

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here