जांबोरी मैदानाखाली असे काही आढळले ज्याने मैदानाला मिळेल संजीवनी

103

वरळीतील ‘महात्मा गांधी मैदान’ म्हणजेच ‘जांबोरी मैदान’ याठिकाणी विविध क्रीडा प्रकारांना पूरक अशा सुधारणा करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे या मैदानास एक अनोखे व अभिनव रुपडे बहाल झाले आहे. या मैदानाच्या समतलीकरणाचे काम सुरु असताना मैदानाच्या एका कोप-यात जमिनीखाली एक ब्रिटिशकालीन पाण्याची टाकी आढळून आली आहे. विशेष म्हणजे या टाकीची नोंद सरकारी दफ्तरात किंवा महानगरपालिकेच्या कागदपत्रांमध्ये आढळून आली नाही. सुमारे सव्वालाख लीटर पाणी साठवण क्षमता असणा-या या टाकीचा उपयोग आता वर्षा जल संचयनांतर्गत पावसाचे पाणी साठविण्यासाठी केला जाणार आहे. हेच पाणी नंतर ‘स्प्रिन्कलर्स’ द्वारे मैदानावर शिंपडले जाणार आहे.

( हेही वाचा : प्रतीक्षानगर पाठोपाठ आता ‘बेस्ट’चे सांताक्रूझ आगारसुद्धा होणार बंद? )

ब्रिटिशकालीन पाण्याची टाकी

प्रामुख्याने मैदानात तब्बल १५ हजार चौरस फुटांचे एक स्वतंत्र क्रीडांगण विकसित करण्यात आले आहे. त्याचबरोबर कबड्डी – बॅडमिंटनसह इतरही खेळ खेळता येतील असे कोर्ट, फुटबॉल मैदान, जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी स्वतंत्र स्केटींग ट्रॅक, पदपथ, लाकडी उपकरणे असणारी खुली व्यायामशाळा, बसण्यासाठी बाक, सूर्यास्तानंतर मैदान उजळून निघावे यासाठी पर्यावरणपूरक एलईडी दिव्यांची वैशिष्ट्यपूर्ण रचना, एलईडी दिवे असणारे शोभिवंत झोके, एलईडी दिव्यांचा वापर करुन तयार करण्यात आलेले आकर्षक नंबर गेम यांसारख्या विविध सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे जांबोरी मैदानाचे रुपडे अधिक आकर्षक करणा-या या सुधारणा ‘जी दक्षिण’ विभागाने अवघ्या ४ महिन्यांच्या विक्रमी वेळेत केल्या आहेत. तसेच याबाबत आवर्जून नोंद घ्यावी, अशी बाब म्हणजे मैदानाची कामे सुरु असताना मैदानाच्या खाली सुमारे सव्वा लाख लीटर क्षमतेची ब्रिटिशकालीन पाण्याची टाकी आढळून आली आहे. या टाकीचा उपयोग आता वर्षा जल संचयनासाठी करण्यात येणार आहे.

मैदानात पडणारे पावसाचे पाणी वाया जाऊ नये यासाठी संपूर्ण मैदानाच्या खाली सुमारे १ ते दीड फुटावर वैशिष्ट्पूर्ण पद्धतीने सच्छिद्र पाईप बसविण्यात आले आहेत. या पाईपांवर बसविण्यात आलेल्या आच्छादनांमुळे केवळ पाणी सच्छिद्र पाईपामध्ये प्रवेश करेल. त्यानंतर मैदानात झिरपणारे हे पावसाचे पाणी ६ इंची पाईपद्वारे ब्रिटिशकालीन पाणी साठवण टाकीमध्ये साठविण्यात येणार आहे. याच पाण्याचा उपयोग ‘स्प्रिन्कलर्स’ साठी करण्यात येणार आहे.

( हेही वाचा : महापालिकेची निवडणूक ऑक्टोबरमध्ये? सत्ताधारी पक्षानेच दिले ‘असे’ संकेत )

जांबोरी मैदानातील सुधारणांबाबत समाधान

जांबोरी मैदानातील या सुधारणांबद्दल अधिक माहिती देताना ‘जी दक्षिण’ विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी सांगितले की, या मैदानात विविध क्रीडा उपयोगी सुविधा आणि सुधारणा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार या मैदानात आता विविध सुधारणा प्रत्यक्षात आल्या असून आणखी काही सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असणा-या मैदानात करण्यात आलेली व येत असलेली कामे ‘जिल्हा नियोजन समिती’च्या व महानगरपालिकेच्या प्रत्येकी ७५ लाख रुपये; यानुसार उपलब्ध झालेल्या दीड कोटी रुपयांच्या संयुक्त निधीमधून करण्यात येत आहेत. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतीच या मैदानाची पाहणी केली व तेथे सुरू असलेल्या सुधारणांबाबत समाधान व्यक्त केले. महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या व अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनानुसार आणि उप आयुक्त (परिमंडळ २) हर्षद काळे यांच्या नेतृत्वात मैदानातील विविधस्तरिय सुधारणाविषयक कार्यवाही करण्यात आली आहे.

वरळीतील ऐतिहासिक जांबोरी मैदानात लवकरच खुले वाचनालय व त्यावर व्ह्युईन्ग डेक, योग केंद्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा, लहान मुलांसाठी खेळणी इत्यादी सुविधादेखील लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. ही कार्यवाही सध्या प्रगतीपथावर असल्याचेही शरद उघडे यांनी यानिमित्ताने सांगितले आहे. या १ लाख ४५ हजार चौरस फुटांचे हे विस्तीर्ण मैदान आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.