कोस्टल भुयारी मार्गाच्या अंतिम टप्प्यात पोहोचला ‘मावळा’

मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (कोस्टल रोड) बांधकामातील प्रियदर्शिनी पार्क ते छोटा चौपाटी दरम्यान २.०७० किलोमीटर अंतराचा बोगदा दोन्ही बाजूने बांधण्यात येत आहे. यातील पहिल्या बोगद्याचा २ किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला आहे. तर उर्वरित ७० मीटर लांबीच्या बोगद्याचे काम येत्या ८ ते १० दिवसात पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे एकाबाजुला कोरोनाच्या साथरोगाशी आपण झुंज देत असताना अनेक विकासकामांना याचा फटका बसला आहे, परंतु दुसरीकडे भूमिगत राहत मावळ्याने आपले लक्ष्य नियोजित वेळेत गाठण्याचा पराक्रम केला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकल्‍पाचे सुमारे ५० टक्‍के काम पूर्ण झाले असून हा संपूर्ण प्रकल्‍प डिसेंबर २०२३ मध्‍ये पूर्ण होणे अपेक्षित असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

महानगरपालिका आयुक्‍त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या अधिपत्याखाली अतिरिक्त आयुक्‍त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्‍याकडे कोस्टल रोड प्रकल्पाची धुरा सोपवण्यात आल्यानंतर त्यांनी या प्रकल्पाला चहुबांजुनी विरोध होत असतानाही प्रकल्प दुसऱ्या बाजुने पुढे रेटून नेण्याचा प्रयत्न करत नियोजित वेळेत तो पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. प्रकल्पाचे मुख्य अभियंता विजय निघोट यांच्या समन्वयातून विविध कामे वेगाने सुरु ठेवण्यात भिडे यांनी आपले कौशल्य आणि मेट्रो रेल्वे प्रकल्पातील अनुभव पणाला लावला आहे.

कोरोना काळातही वेगाने काम

मुंबई किनारा रस्ता प्रकल्पातील पॅकेज ४ अंतर्गत मुख्यत्वे दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी प्रत्येकी १ अशा एकूण २ बोगद्यांचे काम अंतर्भूत आहे. हे बोगदे प्रियदर्शिनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गालगत (मरिन ड्राईव्ह) येथे असणाऱ्या ‘छोटा चौपाटी’ पर्यंत बांधले जात आहेत. तसेच ते ‘मलबार हिल’ च्या खालून जाणार आहेत. या दोन्ही बोगद्यांसाठीचे खोदकाम हे जमिनीखाली १० मीटर ते ७० मीटर एवढ्या खोलीवर करण्यात येत आहे.

या प्रकल्पातील पहिला बोगदा खणन करण्यास ११ जानेवारी २०२१ रोजी प्रियदर्शनी पार्क येथून सुरूवात करण्‍यात आली होती. या बोगद्याचा एक किलोमीटरचा टप्‍पा ४ सप्टेंबर २०२१ रोजी पूर्ण झाला. तर २ किलो‍मीटरचा टप्‍पा २९ डिसेंबर २०२१ रोजी पूर्ण झाला आहे. पहिल्‍या बोगद्यासाठी उर्वरित ७० मीटर खणन बाकी असून ते येत्या १० दिवसांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. कोविड विषाणू साथरोगाच्या काळातदेखील या प्रकल्पाच्या बांधकामावर विपरित परिणाम न होऊ देता वेगाने काम करुन घेण्‍यामध्‍ये महानगरपालिकेला यश मिळाले आहे.

( हेही वाचा : रेक्लेमेशन – वांद्रे वंडरलँड ‘या’ तारखेपर्यंत पर्यटकांसाठी बंद! )

खोदकाम बोगदा खणणारे संयंत्र

या दोन्ही बोगद्यांची लांबी ही प्रत्‍येकी २.०७० किलोमीटर एवढी आहे. दोन्ही बोगद्यांचा व्यास हा १२.१९ मीटर आहे. या बोगद्यांचे खोदकाम करताना आतल्या बाजूने वर्तुळाकृती पद्धतीने काँक्रिटचे अस्तरीकरण केले जाते. त्‍यामुळे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बोगद्याचा अंतर्गत व्यास हा प्रत्‍येकी ११ मीटर इतका असणार आहे. दोन्ही बोगदे हे दोन बाजूंच्या वाहतुकीसाठी अर्थात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहतुकीसाठी स्वतंत्रपणे उपयोगात येतील. सुरक्षेची व प्रतिबंधात्‍मक उपायोजना म्हणून दोन्ही बोगद्यांना जोडणारे ए‍कंदर ११ छेद बोगदेही या बोगद्यांचा भाग असणार आहेत. या बोगद्यांसाठी आपत्कालीन नियत्रंण कक्ष असून त्यामध्ये स्वयंचलित यंत्रणादेखील कार्यान्वित करण्यात येणार आहे. या बोगद्यांमध्‍ये ‘सकार्डो’ ही वायूविजन प्रणाली लावली जाणार असून जी भारतामध्‍ये रस्‍ते बोगद्यांसाठी प्रथमच वापरली जात आहे.

या बोगद्यांचे खोदकाम बोगदा खणणारे संयंत्र (टीबीएम – टनेल बोअरींग मशिन) च्या सहाय्याने केले जात असून ते भारतातील सर्वात मोठ्या व्‍यासाचे टीबीएम संयंत्र आहे. या संयंत्राचे ‘मावळा’ असे नामकरण करण्यात आले आहे. हे संयंत्रही वैशिष्ट्यपूर्ण आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here