महालक्ष्मी रेसकोर्सची जागेचा भाडेकरार संपुष्टात येवून ९ वर्षे उलटली तरी अद्याप सरकारच्यावतीने कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे ना भाडेकराराचे नुतनीकरण केले जात ना जागा सरकार ताब्यात घेत. त्यामुळे महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा महसूल थकला गेला आहे. परंतु आता राज्याच्या नगरविकास खात्यानेच रॉयल टर्फ क्लबकडून हमीपत्र लिहून घेत शासनाच्या पुढील निर्णयापर्यंतची थकीत रक्कम वसूल करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे रॉयल टर्फ क्लबने हमी पत्र दिल्यास महापालिकेला सन २०१३पासूनची थकीत भाड्याची रक्कम वसूल करता येणार आहे.
महालक्ष्मी रेसकोर्सची जागा ताब्यात घेण्याचा ठराव महापालिका सभागृहाने केल्यानंतरही भाडेकरार संपुष्टात येवून ९ वर्षे पूर्ण होत आली तरी हा भूखंड सरकार आणि महापालिकेला ताब्यात घेता आलेला नाही. भाडेकरार संपुष्टात आल्यानंतर राज्यात तीन मुख्यमंत्री विराजमान झाले. परंतु करार संपुष्टात आल्यानंतरही राज्यातील शिंदे सरकारला रॉयल टर्फ क्लबला बाहेरचा रस्ता दाखवण्याची हिंमत दाखवता आलेली नाही. रॉयल टर्फ क्लबने भाडेकरार संपल्यानंतरही आपले वार्षिक भाडे घ्यावे म्हणून महापालिकेकडे तगादा लावला आहे, परंतु भाडेकराराचे नुतनीकरण न झाल्याने महापालिका भाडे स्वीकारत नाही. त्यामुळे सरकार ना क्लबला बाहेरचा रस्ता दाखवत, ना त्यांच्याकडून भाडे आकारत. त्यामुळे या वादाचा फायदा घेत सरकारच या क्लबला छुपी मदत करत असल्याचे बोलले जात होते.
दरम्यान, सरकारने या रेसकोर्सची जागा ताब्यात घेण्याबाबतची पुढील कार्यवाही केली नसली तरी भाडेकरार नसल्याने महापालिकेला भाड्याची रक्कम वसूल करण्यात येणारी अडचण लक्षात घेता नगरविकास खात्याने रेसकोर्सची जागा भाडेकरारावर दिलेल्या रॉयल वेस्टर्न टर्फ क्लबकडून हमीपत्र लिहून घेत शासनाच्या पुढील निर्णयासापेक्षा भाड्याची थकीत रक्कम वसूल करण्याचे पत्र पाठवले असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे २०१३पासूनचे जुन्या दरानुसार भाडे वसूल करण्याचे निर्देश महापालिकेला दिल्याची माहिती मिळत आहे.
रेसकोर्सच्या स्थलांतलासाठी चार पर्याय
रेसकोर्सची जागा ताब्यात घेण्याचा निर्णय झाल्यास त्याठिकाणी सरकारच्यावतीने थिमपार्क बनवले जाणार आहे. त्यामुळे याठिकाणी थिमपार्क बनवल्यास रेसकोर्स अन्य जागी स्थलांतरीत करण्यासाठी चार पर्याय तयार करण्यात आले आहे. यामध्ये मुलुंड डम्पिंग ग्राऊंडसह आसपासची जागा तसेच सिडको, नवी मुंबई तसेच उरण आदी जागांचा पर्याय सरकारच्या विचाराधीन आहे. त्यामुळे रेसकोर्सच्या जागेवर थिमपार्क बनल्यास रेसकोर्स हे मुंबई ठाण्याच्या सिमेवर किंवा नवीमुंबई, उरण किंव सिडकोच्या जागेवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Join Our WhatsApp Community