मुंबईतील नालेसफाईच्या कामांची पाहणी करण्यासाठी आयुक्तांनी केवळ चार ठिकाणे निश्चित केली होती, परंतु यापैकी तीन ठिकाणी मिठी नदीचेच भाग होते, तर वाशी नाका येथील नाल्याची पाहणी आयुक्तांनी परस्पर रद्द करून वांद्र्यातील बांधकाम सुरु असलेल्या चमडावाडी नाल्याची पाहणी केली. परंतु एकाच मिठी नदीची पाहणी करून आयुक्तांनी नालेसफाईच्या कामांच्या पाहणीचे चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे मिठी नदीच्या कामांसाठी मागील वर्षी दोन वर्षांकरता कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली असून ही या कामांच्या यंत्रणा कार्यरत असल्यानेच आयुक्तांनी केवळ मिठी नदीच्या कामांची पाहणी केल्याचेही बोलले जात आहे.
( हेही वाचा : चहल म्हणतात, ३१ मे काय, १५ मे पूर्वीच नालेसफाई करून दाखवतो )
मुंबईतील मिठी नदीसह इतर नद्यांच्या कामांसाठी मागील वर्षीच स्थायी समितीच्या मान्यतेने दोन वर्षांकरता कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. तर यावर्षी नालेसफाईच्या कामांचे प्रस्ताव मागील आठवड्यात मंजूर केल्यानंतर त्यांना कार्यादेश दिल्यानंतर प्रत्यक्ष कामांना सुरुवात होत आहे, तर काही ठिकाणी ही सुरुवातही झालेली नाही.
आयुक्तांचा दौरा
आयुक्तांनी नालेसफाईच्या पाहणी दौऱ्यासाठी वांद्रे कुला संकुल परिसराती बीकेसी कनेक्टर ब्रीज, धिरुभाई अंबानी शाळेजवळील मिठी नदीच्या पश्चिम बाजुला असलेला भाग, मिठी नदीशी संलग्न बीकेसीतील उत्तर भारतीय भवनसमोरी मिठी नदीची पाहणी व पूर्व उपनगरातील वाशी नाका नाल्याची पाहणी अशाप्रकारे ठिकाण निश्चित केली होती. परंतु जी तीन ठिकाणे होती, त्याठिकाणी मागील वर्षी नेमणूक केलेलाच कंत्राटदार कार्यरत आहे. तर इतर ठिकाणी नाल्यांच्या सफाईसाठी अद्यापही नालेसफाईच्या कामांना पूर्ण क्षमतेने सुरूवात झालेली नाही. त्यामुळे आयुक्तांनी नालेसफाईच्या कामांवरून प्रशासनावर ज्या काही भाजपने आयोजित केलेल्या पाहणीनंतर तक्रारी केल्या, त्या सर्वांचा खुलासा करण्यासाठीच आयुक्तांनी हा दौरा आयोजित केल्याचे दिसून आले.
विशेष म्हणजे अंबानी शाळेजवळील नाल्याच्याठिकाणी आयुक्तांनी मोजून सहा दूरचित्रवाहिन्यांच्या पत्रकारांना स्वतंत्रपणे मुलाखत दिली. भर उन्हात उभे राहत आयुक्तांनी सर्वांना मुलाखत देताना प्रशासनाला आणि आपल्याला अभिप्रेत असलेली स्क्रिप्टच वाचून दाखवावी अशाप्रकारे माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र, संयुक्तपणे त्यांनी आतापर्यंत किती टक्के नालेसफाई झाली याची माहितीच देण्याचे टाळले. त्यामुळे प्रशासनाची बाजू मांडण्यासाठी पत्रकारांना नाल्याच्या ठिकाणी नेत मुलाखत देण्यासाठीच आयुक्तांनी नालेसफाईच्या पाहणी दौरा आयोजित केला होता की काय असा प्रश्न उपस्थितांना पडला.
Join Our WhatsApp Community