भाजपने नालेसफाईच्या कामाच्या पाहणी केल्यानंतरच याचा सचित्र अहवाल महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना सादर केल्यानंतर गुरुवारी चहल यांनी शहरासह पश्चिम उपनगरातील काही नाल्यांच्या सफाईची पाहणी केली. यावेळी त्यांनी पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या नाले सफाईचे ३१ मे पूर्वी करण्याचे टार्गेट असले तरीही ही कामे दोन पाळयांमध्ये करून १५मे पूर्वी पूर्ण केली जातील,असे प्रसारमाध्यमांशी बोलतांना स्पष्ट केले. एकूण नालेसफाईचे ७० टक्के काम हे पावसाळयापूर्वी करण्यात येत असून हे काम ३१ मे ऐवजी १५ मेपूर्वीच करून दाखवले जाईल, असाही विश्वास चहल यांनी व्यक्त केला.
( हेही वाचा : नालेसफाईच्या कामांवर १४ पथकांची नजर! )
मुंबईतील नालेसफाईच्या कामाला सुरवात झाल्यानंतर महापालिका प्रशासक तथा आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी नाले सफाईच्या कामाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी मिठी नदीसह चमडावाडी नाल्याची बांधकामांची पाहणी केली. या पाहणीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना चहल यांनी मुंबईत ३४० किलोमीटरचे नाले असून या सर्व नाल्यांची सफाई ३१ मे पूर्वी पूर्ण करण्याचे लक्ष्य असले तरी आजवळ ८ तासांमध्ये केली जाणाऱ्या नालेसफाईचे काम १६ तासांमध्ये पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे हे काम जास्त मनुष्यबळ वापरून १५ मे पूर्वीच पूर्ण केले जाणार आहे.
मुंबईचे सर्व नाले स्वच्छ होण्यासाठी आपण जातीने लक्ष देत असून नाल्यातील काढलेल्या गाळाचे व्हिडीओ चित्रणासह वजन मोजमाप केले जाईल, याच आधारे याचे वजन काट्यावर मोजमाप करतानाही व्हिडीओ चित्रण होईल. त्यामुळे कुठेही नालेसफाईच्या कामांमध्ये कंत्राटदारांना मोकळीक दिली जाणार नाही. दरवर्षी आपण एकूण गाळाचे परिणाम निश्चित करत असलो तरी यंदा पावसाळ्यापूर्वी काढण्यात येणाऱ्या गाळाचे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी निश्चित केलेला गाळ काढण्यात आल्यानंतर त्यानंतर पुढील गाळ काढण्याचे कार्यादेश दिले जातील. त्यामुळे दिलेले टार्गेट कंत्राटदार पूर्ण करण्यासाठी नालेसफाई अगदी योग्यप्रकारे करेल आणि अतिरिक्त काम मिळावे म्हणून हे काम पूर्णही करेल. याद्वारे त्यांना अतिरिक्त काम दिल्याने त्यांना त्याचे पैसेही मिळतील व महापालिकेला नालेही योग्यप्रकारे स्वच्छ करून मिळतील,असेही चहल यांनी स्पष्ट केले.
आठवड्यात दोनदा अतिरिक्त आयुक्तांची पाहणी
नालेसफाईच्या कामाची पाहणीदरम्याने चहल यांनी अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू यांना निर्देश देत सर्व अतिरिक्त आयुक्तांनी आठवड्यातून दोनदा आपल्या संबंधित विभागांमधील नाल्यांची पाहणी केली. त्याचा अहवाल आपल्या द्यावा आणि त्यानंतर आठवड्यातून एकदा आपण या नाल्यांची पाहणी संबंधित अतिरिक्त आयुक्तांसह अधिकाऱ्यांसह करुन यावर विशेष लक्ष देणार आहोत. याशिवाय भरारी पथक तैनात करण्यात आलेली आहेतच,असेही त्यांनी स्पष्ट केले.
हिंदमाताच्या इतिहासाची पुनर्रावृत्ती होऊ देणार नाही
हिंदमाताच्या ठिकाणी तुंबणाऱ्या पाण्याच्या समस्येबाबत येथील रस्त्यांची उंची वाढवतानाच येथील पाणी सेंट झेवियर्स आणि प्रमोद महाजन उद्यानात वळवण्यात आलेल्या भूमिगत टाक्यांमध्ये वळवण्याचे काम पूर्ण झाल्याने या दोन्ही टाक्या यंदा वापरात आहे. या टाक्यांची काही काम शिल्लक असले तरी हिंदमाता वाहतूक कोंडी होण्याची समस्या यंदा राहणार नाही. तसेच पाणी तुंबण्याची समस्याही दूर झालेली पहायला मिळेल,असे सांगत हिंदमाताच्या इतिहासाची पुनर्रावृत्ती यंदा होणार नाही असाही विश्वास व्यक्त केला.
माहुल,मोगरा पंपिंग स्टेशननंतर मुंबई पूरमुक्त
मुंबई महापालिकेच्यावतीने आपण आल्यानंतर माहुल आणि मोगरा पंपिंग स्टेशनच्या कामांचे कार्यादेश दिले असून ही कामे पूर्ण झाल्यानंतर पुढील दोन ते तीन वर्षांनंतर मुंबई पूरमुक्त होईल,असाही दावा चहल यांनी केला आहे.
Join Our WhatsApp Community