‘फूलराणी’ च्या शोधात मुंबईचे रस्ते

103

मुंबईतील पूर्व द्रुतगती महामार्गावर आणि वरळीतील रस्त्यांवर फुललेल्या बसंत राणीमुळे जनतेला भुरळ पाडलेली असून त्या फुलराणीमुळे मुंबईच्या आकर्षणात भर पडत आहे. अशाप्रकारच्या बसंतराणीमुळे रस्त्यांचे रुपडेच पालटले जात असल्याने आता मुंबई महापालिका बसंतराणीप्रमाणे फुलांनी बहरणाऱ्या झाडांची लागवड करण्यावर भर देण्याचा विचारात आहे. त्यामुळे नव्याने बनवण्यात येणाऱ्या तसेच अन्य महत्वाच्या रस्त्यांवर अशाप्रकारची फुलझाडे लावण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.

( हेही वाचा : पगार वाढणार! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना गुढीपाडव्याची भेट )

वरळीतील काही रस्त्यांवर फुलली ‘बसंत रानी’ 

मुंबईतील पूर्व द्रुतगती मार्गावरील छेडा नगर ते विक्रोळी या भागात व विशेष करुन मार्गाच्या मध्यभागी असणा-या दुभाजकावर पर्यावरणाच्या व सुशोभिकरणाच्या दृष्टीकोनातून विविध झाडे लावण्यात आली आहेत. या झाडांमध्ये ‘बसंत रानी’ या प्रकारच्या झाडांचाही समावेश आहे. सुमारे २५ ते ३० फुट उंच असणा-या ह्या झाडांना दरवर्षी साधारणपणे वसंत ऋतूत बहर येतो. मात्र, यावर्षी वसंत ऋतू सुरु होण्यापूर्वीच ही झाडे फुलांनी बहरली जात आहेत. फुलांनी डवरलेली ‘बसंत रानी’ ची झाडे नागरिकांचे व पुष्पप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहेत. मुंबईत सुमारे २९ लाख ७५ हजार २८३ एवढे वृक्ष आहेत. यामध्येच ७ हजारां पेक्षा अधिक ‘बसंत रानी’ वृक्षांचाही समावेश आहे. हिंदी भाषेत ‘बसंत रानी’ अशी ओळख असणा-या या झाडाचे वनस्पतीय शास्त्रीय नाव ‘टॅब्यूबिया पेंटाफायला’असे आहे. तर याच झाडाला इंग्रजीमध्ये ‘पिंक ट्रंम्पेट, पिंक पाऊल, पिंक टिकोमा’ या नावांनीही ओळखले जाते. पूर्व द्रुतगती महामार्गाप्रमाणे आता वरळीतील काही रस्त्यांवरही लावलेली बसंत रानी फुलांनी बहरलेली आहे.

झाडे लावण्याचे निर्देश

बसंतीरानीप्रमाणे आकर्षक फुलांनी बहरणाऱ्या झाडांची लागवड मुंबईतील अन्य रस्त्यांवरही करण्याचा विचारही महापालिकेचा आहे. मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी मुंबईतील काही महत्वाच्या रस्त्यांवर अशाप्रकारची झाडे लावण्याचे निर्देश उद्यान विभागाला दिले आहे. त्यानुसार जिथे अशाप्रकारची झाडे लावता येतील अशा रस्त्यांचा आढावा घेण्यात येत आहे. उद्यान विभाग व रस्ते विभाग आता अशा रस्त्यांची माहिती गोळा करून याचा अहवाल बनवणार असून त्यानंतर अशा महत्वाच्या तसेच इतरही काही रस्त्यांवर फुलांनी बहरणारी झाडे लावली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून मिळत आहे. अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फुलांनी बहरणारी झाडे द्रुतगती महामार्गा व्यतिरिक्त अन्य महत्वाच्या रस्त्यांवर लावण्याचा विचार असल्याचे स्पष्ट केले. रस्ते विभागाकडून आढावा घेतल्यानंतर उद्यान विभागाच्यावतीने यबाबातची कार्यवाही केली जाईल. या बहरणाऱ्या फुलझाडांमुळे मुंबईच्या सुशोभिकरणातही भर पडत असून रस्त्यांसह परिसरही आकर्षक दिसून येतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.